UP Crime : उत्तर प्रदेशाच्या (UP News) बरेलीमध्ये एका पतीने भर बाजारात पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली आहे. काही दिवसांपूर्वी याच महिलेने तिच्या पतीला जामीन (Bail) मिळवून देऊन तुरुंगातून बाहेर काढले होते. आरोपी पतीने एका फळ विक्रेत्यावरही गोळीबार केल्याचे समोर आले आहे. फळ विक्रेत्यावर सध्या रुग्णालयात उपाचर सुरु आहेत. या घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी (UP Police) अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे आपण केलेल्या कृत्याचा आपल्याला पश्चाताप नसल्याचे आरोपीने म्हटलं आहे.
बरेलीच्या पश्चिमेकडील फतेहगंज भागात हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. शनिवारी संध्याकाळी, कृष्णपाल लोधीने बाजारातच आपल्या पत्नीवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात 32 वर्षीय पूजाचा जागीच मृत्यू झाला. आरोपीने पूजाचा 30 वर्षीय मित्र मुन्नावरही गोळीबार केला. पूजाचे मुन्नासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपी कृष्णपालला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला शस्त्रासह अटक केली आहे. आरोपींविरुद्ध विविध कलमाअंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कृष्णपालला त्याच्या पत्नीवर फसवणुक केल्याचा संशय होता आणि त्यामुळे त्याने गोळ्या घातल्या, असे चौकशीत सांगितले.
2012 मध्ये पूजाची कृष्णपालसोबत ओळख झाली होती. पूजा कृष्णपालला सातत्याने भेटत होती. पूजाच्या कुटुंबियांना हे मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी पूजाचे लग्न लावून देण्याचे ठरवले. मात्र त्याआधीच पूजा कृष्णपालसोबत फरार झाली आणि तिने त्याच्यासोबत कोर्टात लग्न केले. त्यानंतर अनेक दिवस पूजाच्या नातेवाईकांनी शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्यानंतर पूजाला दोन मुले देखील झाले. पुढचे आयुष्य चांगले जाईल असे पूजाला वाटत होते. मात्र दुसरा मुलगा झाल्यानंतर पती कृष्णपाल पूजावर संशय घेऊ लागला.
पोलीस तपासात जवळच राहणाऱ्या मुन्ना या फळविक्रेत्याशी पूजाचे संबंध निर्माण झाले होते. हा प्रकार पती कृष्णपाल याला कळला होता. पती कृष्णपाल याने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पत्नीच्या अवैध संबंधांवरुन कृष्णपालने पूजाला मारहाण देखील केली होती. त्यानंतर दोघेही वेगवेगळे राहू लागले. त्याचवेळी कृष्णपालने पत्नी पूजाचा प्रियकर मुन्ना याला धमकावले होते. त्यानंतर कृष्णपाल पिस्तुल घेऊन मुन्नाला मारण्यासाठी गेला होता. त्यावेळी मुन्ना सापडला नाही मात्र त्याचा भाऊ दीपक सापडला. तेव्हा कृष्णपालने दीपकवर गोळीबार केला होता. यानंतर दीपकने तक्रार केली आणि कृष्णपालला तुरुंगात पाठवले.
25 दिवसांनंतर पूजाने कृष्णपालला जामीन मिळवून दिला. मात्र त्यानंतर पुन्हा दोघांची भांडणे होऊ लागली. त्यानंतर शनिवारी रागाच्या भरात बाजारत कृष्णपालने पत्नीची हत्या केली. दारूच्या नशेत कृष्णपालने पहिली गोळी झाडल्यावर ती पूजाच्या मानेजवळ लागली आणि ती रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडली, त्यानंतर दुसरी गोळी तिच्या छातीत लागली. यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कृष्णपालने मुन्नावरही गोळीबार केला.