UPA Name might change: देशात भाजपाला पर्याय देण्यासाठी सध्या विरोधकांची एकजुटी केली जात आहे. भाजपाविरोधी नव्या युतीमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) आणि आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) यांचा समावेश आहे. दरम्यान, या नव्या युतीचं संयुक्त पुरोगामी आघाडी (United Progressive Alliance) हे नाव बदललं जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बंगळुरुत 17, 18 जुलैला विरोधकांची बैठक होणार असून यावेळी नाव बदलण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. या बैठकीला 24 पक्ष हजेरी लावणार आहेत.
काँग्रेसप्रणीत युपीए केंद्रात दोन वेळा सत्तेत होती. 2004 ते 2014 दरम्यान युपीएचं सरकार होतं. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या युपीएच्या अध्यक्षा होत्या. काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांना पत्रकार परिषदेत युपीएचं नाव बदललं जाण्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, "आम्ही बैठकीत सर्व निर्णय घेणार आहोत. कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे हे आता सांगू शकत नाही. बैठकीत फक्त आम्ही एकटे नसून, इतर पक्षी आहेत. आम्ही उद्या बैठकीत चर्चा करणार असून त्यानंतर युपीए नाव राहील की अन्य काही हे स्पष्ट होईल".
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रस्तावित भाजप विरोधी गटाचा समान किमान कार्यक्रम असेल आणि बैठकीदरम्यान राज्यांमधील जागा वाटपांवरही चर्चा होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी युतीसाठी समान किमान कार्यक्रम आणि संवादाचे मुद्दे तयार करण्यासाठी एक उपसमिती स्थापन केली जाईल. विरोधी पक्षांच्या संयुक्त प्रचार कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी एक उपसमिती स्थापन केली जाण्याचीही शक्यता आहे, ज्यामध्ये रॅली, अधिवेशने आणि आंदोलने यांचा समावेश आहे.
याशिवाय विरोधी पक्ष ईव्हीएमच्या मुद्द्यावरही चर्चा करणार असून, निवडणूक आयोगाला काही बदल सुचवण्याची शक्यता आहे. प्रस्तावित युतीसाठी एक समान सचिवालय स्थापन केलं जाण्याचीही शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मंगळवारपासून बैठकीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे या बैठकीला संबोधित करणार आहेत. यानंतर दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद पार पडण्याची शक्यता आहे.
2024 च्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा सामना करण्यासाठी विरोधी पक्ष 17 आणि 18 जुलैला बंगळुरुत एकत्र येणार आहेत. यावेळी आपापसातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न असेल. तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त आघाडीची अपेक्षा आहे.
जून 2023 मध्ये सर्वात आधी 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची पहिली बैठक पार पडली होती. दरम्यान, बंगळुरुत होणारी ही विरोधकांची दुसरी बैठक आहे.
सोमवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी डिनर पार्टीचे आयोजन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे डिनर पार्टीला गैरहजर राहण्याची शक्यता आहे. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते दुसऱ्या दिवशी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.