Bollywood OTT Trending Movie: सध्या ओटीटीवर बॉलिवूडचा एक चित्रपट मोठ्या प्रमाणात ट्रेंड आहे. 'दंगल' या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री सान्या मल्होत्राने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'मिसेस' हा चित्रपट 7 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात सान्याने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली. आपल्या स्वप्नांचा विचार न करता घरच्या कामांमध्ये गुंतलेल्या एक हाउसवाइफची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे.
सान्याने तिच्या चित्रपटातील एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आणि लिहिले, "माझे हृदय भरुन आले आहे. ज्यांनी 'मिसेस' हा चित्रपट पाहिला, ऋचा या भूमिकेला प्रेम दिलं, त्या सर्वांनाच अगदी मनापासून धन्यवाद." सान्याने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये सान्या ही हात जोडून उभी असताना दिसत आहे आणि त्याखाली '250 वॉच टाइम' असे लिहिले आहे. आतापर्यंत हा चित्रपट 250 लोकांनी पाहिला आहे. सान्याने हे पोस्टर शेअर करताना प्रेक्षकांचे आभार मानले.
सान्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत चित्रपटातील भूमिकेचे खूप कौतुक केले. यावर एका नेटकऱ्याने लिहिले, "छान चित्रपट". तर दुसऱ्याने लिहिले, "चित्रपट सुपर से उपर आहे". चाहत्यांनी सान्याच्या भूमिकेला प्रचंड पसंती दर्शवली. खरंतर, 'मिसेस' हा 'द ग्रेट इंडियन किचन' या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. 'द ग्रेट इंडियन किचन' या मल्याळम भाषेतील चित्रपटात निमिषा सजयन ही मुख्य भूमिकेत दिसली होती. तसेच 2023 मध्ये 'द ग्रेट इंडियन किचन'चा तमिळ भाषेतदेखील रिमेक बनवला गेला आणि यामध्ये ऐश्वर्या राजेश यांनी मुख्य भूमिका साकारली होती.
आरती कडव यांनी दिग्दर्शित केलेला 'मिसेस' हा सान्या मल्होत्राने आतापर्यंत दिलेल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असल्याचं सांगितलं जात आहे. 'मिसेस' या चित्रपटात निशांत दहिया, कंवलजीत सिंग, अपर्णा घोषाल यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले.