Crime Story : दिसेल तिथून बाळ उचलणाऱ्या आई-बहिणींची गँग; 40 मुलांचं अपहरण करून मारणाऱ्यांचं काय झालं?

Crime Story:  अंजनाबाई गावित, रेणुका शिंदे आणि सीमा गावित या तीन महिलांनी निष्पाप बालकांचा निर्घृण खून केला. नव्वदीच्या दशकात घडलेले बालहत्याकांडाबाबत ऐकून अजूनही अंगावर भीतीने काटा येतो

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 17, 2025, 01:12 PM IST
Crime Story : दिसेल तिथून बाळ उचलणाऱ्या आई-बहिणींची गँग; 40 मुलांचं अपहरण करून मारणाऱ्यांचं काय झालं? title=
maharashtra crime story Kidnapped toddlers then murdered them the story of Gavit Sister

Crime Story:  दोन बहिणी आणि त्यांची आई त्यांनी केलेल्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. जवळपास तीन दशकांपूर्वी घडलेल्या या घटनेने आजही महाराष्ट्रातील नागरिकांच्या अंगावर शहारा येतो. या आरोपी बहिणींचे नाव रेणुका शिंदे आणि सीमा गावित असं आहे. पण महाराष्ट्रात त्यांची ओळख म्हणजे 'गावित बहिणी...' या गावित बहिणींनी 14 मुलांचे अपहरण आणि 9 मुलांची हत्या केली होती. 

कोल्हापुरात अंजना गावित या महिलेला मुलगी झाल्यानंतर तिचा पती सोडून गेला. अंजनाने रेणुका असं त्या मुलीचं नाव ठेवलं. पती सोडून गेल्यानंतर तिने मोहन नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केले. त्यांना सीमा नावाची मुलगी झाली. मात्र सीमाच्या जन्मानंतर मोहनने प्रतिमा नावाच्या महिलेसोबत दुसरं लग्न केलं. इथूनच अंजना गावित हिचा गुन्हेगारी प्रवास सुरू झाला. 

अंजना गावित हिने उदरनिर्वाहासाठी चोऱ्या माऱ्या करायला सुरुवात केली. तिला दोन्ही मुलींनीदेखील साथ दिली. सीमा आणि रेणुका या आई अंजना गावितसोबत गर्दीच्या ठिकाणी  व सार्वजनिक ठिकाणी, धार्मिक स्थळांजवळ पाकिटमारी करणे, सोन-साखळी चोरणे, पर्स चोरी करणे यासारख्या छोट्या-मोठ्या चोऱ्या करायच्या. 

रेणुका शिंदे एका मंदिरात महिलेला लुटण्याचा प्रयत्न करत असताना पकडली गेली. तेव्हा तिच्यासोबत एक वर्षांचा मुलगादेखील होता. जमावाने तिला पकडल्यानंतर रेणुकाने मुलाला पुढे करत जमावापुढे माफी मागू लागली. तेव्हा मुलाकडे पाहून तिला सोडू देण्यात आले. तेव्हा गावित बहिणींनी ही नवी कल्पना शोधली. बाळाला घेऊन तिघीही चोऱ्या करायच्या. त्याचवेळी त्यांच्या डोक्यात नवीन कल्पना शिजली ते म्हणजे मुलांकडून गुन्हा घडवून आणणे... 

1990 ते 1996 पर्यंत माय-लेकीच्या या तिकडीने तीन डझनहून अधीक मुलांचे अपहरण केले. या मुलांमध्ये नवजात मुलं ते 12 वर्षाखालील मुलं होती. या मुलांना भीक मागण्यासाठी आणि चोरी करण्यासाठी पुढे करायच्या. इतकंच नव्हे तर मुलांना अर्धपोटी ठेवायच्या. तसंच, ही मुलं पळून जाणार नाहीत याची काळजीही घ्यायच्या. या तिघींविरोधात 125 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. 

एकदा बाजारपेठेत चोरी करताना सीमा गावित पकडली गेली. तिथेच जवळ रेणुका उभी होती तिच्यासोबत अपहत्य मुलगा होता. सीमाला पकडल्यानंतर रेणुकाने मुलाचे डोके जमीनीवर आपटले. मुलाचे डोके फुटल्यानंतर भळाभळा रक्त वाहायला लागले. तेव्हा सर्व गर्दीचे लक्ष तिथे गेले आणि संधी साधत दोघी बहिणी तिथून पळून गेल्या. 

दोघी बहिणी आणि अंजली गावित या त्रिकुटाने 1990 ते 1996 पर्यंत 40 हून अधिक मुलांचे अपहरण केले. या मुलांमधील संतोष, बंटी, स्वाति, गुड्डू, मीना, राजा, श्रद्धा, क्रांति, गौरी और पंकज यांचे अपहरण झाल्याचे सिद्ध झाले. तर संतोष, श्रद्धा, गौरी, पंकज आणि अंजली यांची हत्या केल्याचे सिद्ध झाले. 

तिघींनी 18 महिन्यांच्या एका मुलीची हत्या केली. तिचे डोके बस स्टँडच्या एका लोखंडी रॉडवर वारंवार आपटले आणि तिची हत्या केली. त्यानंतर तिघी पोटभरून हसल्या नंतर वडापाव खाल्ला. नंतर त्यांनी एका अडीच वर्षांच्या मुलीची हत्या केली तिचा मृतदेह एका बँगेत भरला आणि सिनेमा बघायला गेले आणि परतत असताना तिचा मृतदेह फेकून दिला. एका अन्य मुलाच्या शरीरावर 42 वार करुन मृतदेहावर एक डिझाइन बनवले होते. 

असं उघडकीस आलं हत्याकांड

1996मध्ये अंजनाने रेणुका आणि सीमासोबत मिळून तिच्या पतीची म्हणजेच मोहन आणि प्रतिमाच्या मुलीची हत्या केली. या हत्येनंतर मोहन आणि प्रतिमाच्या दुसऱ्या मुलीचाही जीव घेण्याच्या तयारीत असतानाच याची कुणकुण प्रतिमाला लागली. त्यांनी पोलिसांना याबाबत सूचना दिला. त्यानंतर अंजना, रेणुका आणि सीमा यांना अटक करण्यात आली. 

पोलिसांनी त्यांच्या घरात छापेमारी केल्यानंतर मुलांचे अनेक कपडे आणि खेळणी मिळाली. रेणुकाचा पती किरणदेखील या हत्याकांडात सामील होता. मात्र नंतर किरण माफीचा साक्षीदार झाला आणि अखेर या प्रकरणाचा पर्दाफाश कोल्हापुर पोलिसांनी केला. 

रेणुका आणि सीमा या बहिणीवर बालहत्याकांडाचा खटला सुरू झाला. न्यायालयाने पहिले दोघींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र,मुंबई उच्च न्यायालायात फाशीच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत करण्याची याचिका दाखल केली. मुंबई न्यायालयानेही याचिका स्वीकारत दोघींना जन्मठेपीची शिक्षा सुनावली. दोघींनाही मरेपर्यंत जन्मठेप ही शिक्षा दोघीही भोगतील. 1997 साली अंजनाबाई हिचा कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.