लखनऊ : Uttar Pradesh: एक धक्कादायक घटना. छठ पूजेसाठी ( Chhath Puja) नवीन साडी न घेतल्याने पत्नी नाराज झाली. मात्र, पत्नीची नाराजी दूर करण्याऐवजी पतीने बंदूक रोखत तिच्यावर गोळ्या झाडल्या. यात पत्नीचा मृत्यू झाला. (Uttar Pradesh: Wife asks for new sari for Chhath Puja)
आपल्याला नवीन साडी घ्या, असा तगादा पत्नीने लावल्याने पतीचा पारा चढला. रागाच्या भरात पतीने जे केले त्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला. ही घटना आहे उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील. छठ पूजेसाठी साडी घेण्यास सांगितल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना पुढे आली आहे. आरोपी पतीने सैन्यातून निवृत्त झालेल्या वडिलांच्या परवाना असलेल्या बंदुकीने पत्नीवर गोळी झाडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
देवरियाच्या भटनी पोलीस स्टेशन हद्दीतील पायसी गावात राहणारा अर्जुन मिश्रा यांची 27 वर्षीय मुलगी अनुराधा मिश्रा तथा अन्नू हिचा विवाह चार वर्षांपूर्वी पैना गावातील पुरब पट्टी येथील रहिवासी नरेंद्र तिवारी याच्याशी झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराधाचा पतीसोबत काही दिवसांपासून वाद सुरू होता. 19 नोव्हेंबरला होणाऱ्या भावाच्या तिलकोत्सवासाठी खरेदीसाठी जाण्याबाबत पत्नी आग्रही होती. मात्र, पती नरेंद्र तिचं ऐकत नव्हता. त्यामुळे ती नाराज झाली होती.
मंगळवारी नरेंद्रने अनुराधासाठी नव्हे तर स्वत:साठी कपडे घेतले. तेव्हा पत्नी अनुराधा चिडली आणि तिने पतीसोबत भांडण सुरू केले. यादरम्यान तिने माहेरी बोलण्यासाठी पतीचा मोबाईल मागितला असता पतीने तो दिला नाही आणि मोबाईल लपवून ठेवला. दरम्यान, संतापलेल्या नरेंद्रने वडील गंगा सागर तिवारी यांच्या परवाना असलेल्या बंदुकीने अनुराधा यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी घटनेत वापरलेली बंदूक जप्त केली आहे. गोळीचा आवाज ऐकून घरातील लोक आणि आजूबाजूचे लोक तेथे पोहोचले. खोलीत पाहिले तर अनुराधा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी पतीला घरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनेत वापरलेली बंदूकही जप्त केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेतली.