Valentines Day 2024 : प्रेमाचा दिवस, म्हणून जगभरात 14 फेब्रुवारी 2024 हा दिवस व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला जातो. कोणा एका व्यक्तीवर असणारं प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. फक्त व्यक्तीच नव्हे, तर मुळात प्रेमाची सुरेख भावना व्यक्त करण्याचा हा एक गोड दिवस. जगाच्या पाठीवर प्रत्येकजण आपआपल्या परिनं हा दिवस साजरा करताना दिसत आहे. पण, या साऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं वेगळेपण जपलं आहे ते म्हणजे भारतातील काही खेडेगावांनी.
जिथं जगभरात प्रेमाचा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे तिथंच तुम्हाला भारतातील अनोख्या जोड्यांची माहिती असणंही तितकंच गरजेचं. कारण कोणत्याही प्रेमकथेशिवायच या जोड्यांची नावं अनेकांच्या तोंडी असतात. राजस्थानात तुम्हाला हे भन्नाट व्हॅलेंटाईन्स पाहायला मिळतील, ज्यांना कोणीही वेगळं करू शकत नाही.
आंतरराष्ट्रीय स्तरावर हा भाग संत्री आणि कोटा दगडासाठी ओळखला जातो. पण, आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे इथं 44 गावांची नावं स्त्रिलिंगी तर तितकीच गावं पुल्लिंगी नावांनीही ओळखली जातात. थोरामोठ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार गतकाळामध्ये जेव्हा एखादं मोठं गाव वसवलं जात होतं तेव्हा त्याचं नाव पुल्लिंगीच ठेवलं जात असे. त्यानंतर जेव्हा या गावाच्या आजुबाजूला इतर ठिकाणी वस्ती वाढत गेली तसतसं या दोन्ही गावांमध्ये सलोखा आणि आपुलकी कायम राहावी यासाठी त्या गावाला स्त्रिलिंगी नाव दिलं जात होतं. अशा रितीनं अनेक गावांना पुल्लिंगी आणि स्त्रिलिंगी अशी जोडनावं आहेत.
गावांना साधर्म्य असणारी नावं देण्यामागचा आणखी एक हेतू म्हणजे अशी नावं लक्षात ठेवणं कठीण नसतं. लहानशी शक्कल लढवून गावांना एकसारखी पण तरीही काहीशी वेगळी नावं दिली जाणं कमालच आहे ना? तुम्हाला कशा वाटल्या या अनोख्या व्हॅलंटाईन जोड्या?
राजस्थानातील हाडौती येथील आठ पंचायत समित्यांमधील 610 गावांपैकी 44 गावांची ओळखच त्यांच्या जोड्यांमुळं आहे. या गावांची नावंही तितकीच रंजक. भिलवाड़ा-भिलवाड़ी, बड़बेला ,बडबेली, धानौदा धानौदी, रलायता-रलायती, कनवाड़ा-कनवाडी, खेरखेड़ा-खेरखेड़ी, देवर-देवरी, बरखेड़ा-बरखेड़ी, हतोला-हतोली, अलोदा-अलोदी, चछलाव-चछलाई, सोयला-सोयली, दोबडा-दोबडी अशा भन्नाट जोड्या आहेत.