नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी तिसऱ्यांदा राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीय. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून सचिन पायलट यांनी सोमवारी शपथ घेतली. या शपथ ग्रहण समारंभात राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे यादेखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी वसुंधरा राजे यांनी आपल्या भाच्याशी अर्थात काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांची घेतलेली गळाभेट चर्चेचा विषय ठरलीय. राजकीय मतभेद बाजुला सारून मोठ्या मनानं वसुंधरा राजेंनी ज्योतिरादित्य यांना स्नेहभेट दिली. आत्या-भाच्याची ही गळाभेट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि अनेक विरोधी नेत्यांच्या उपस्थितीत जयपूरच्या अल्बर्ट हॉलमध्ये गेहलोत आणि पायलट यांचा शपथविधी पार पडला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या राजेंनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची भेट घेतली... त्यानंतर याच मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या भाच्याला - ज्योतिरादित्य शिंदे यांना प्रेमानं मिठी मारली. ज्योतिरादित्य शिंदेही यावेळी आपल्या आत्याला स्टेजवर पाहून आनंदी झाले होते.
मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांचं कुटुंब ग्वालियरच्या राजघराण्याशी संबंधित आहे. या घराण्याच्या राजमाता विजयाराजे शिंदे या भारतीय जनता पार्टीच्या संस्थापक सदस्य होत्या.
राजमातांचा मुलगा दिवंगत माधवराव शिंदे काँग्रेस सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. आता माधवराव यांचा मुलगा ज्योतिरादित्य शिंदे मध्यप्रदेशच्या गुना-शिवपुरी लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे खासदार आहेत. केंद्रातील मनमोहन सरकारमध्ये ज्योतिरादित्य यांनी केंद्रीय राज्य मंत्री म्हणूनही काम पाहिलंय.