'कचऱ्यात फेकलं पाहिजे', तरुणाने Lays वर केली टीका; Bingo ने ट्रकभरुन पाठवले चिप्स, म्हणाले 'आम्ही निराश...'

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने लेजच्या मॅजिक मसाला चिप्सवर नाराजी जाहीर करत टीका केली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

शिवराज यादव | Updated: Nov 7, 2023, 03:30 PM IST
'कचऱ्यात फेकलं पाहिजे', तरुणाने Lays वर केली टीका; Bingo ने ट्रकभरुन पाठवले चिप्स, म्हणाले 'आम्ही निराश...' title=

देशातील प्रसिद्ध बटाटा चिप्स ब्रँडमध्ये लेजचाही समावेश आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत अनेकांना त्याचं मॅजिक मसाला फ्लेव्हर आवडतं. त्यांच्या मॅजिक मसाला फ्लेव्हरमध्ये मसाला आणि तिखटाचं मिश्रण असल्याने अनेकजण त्याला पसंती दर्शवतात. मागील काही वर्षांमध्ये लेजने एक मोठी बाजारपेठ ताब्यात घेतली आहे. लेजची चव हे त्याच्या विक्रीमागील मुख्य कारण असल्यानेच, त्यात थोडा जरी बदल झाला तर तो ग्राहकांना आवडत नाही. यादरम्यान एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने लेजच्या मॅजिक मसालाच्या नव्या व्हर्जनवर टीका केली आहे. त्याने एक व्हिडीओ शेअर केला असून, तो व्हायरल झाला आहे. यानंतर कंपनीनेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

झेरवान नावाच्या तरुणाने हा व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये तो लेजने आणलेल्या नव्या मॅजिक मसालावर टीका करताना दिसत आहे. उपहासात्मकपणे तयार केलेल्या या व्हिडीओत तो संताप व्यक्त करत आहे. "तुम्ही माझ्या मॅजिक मसालाशी हे काय केलं आहे? यामध्ये मॅजिक अजिबात राहिलेलं नाही. आता तो गोड मसाला झाला आहे. तुम्ही करु शकता त्यातील ही सर्वात वाईट गोष्ट आहे," असं तो सांगतो. यावेळी त्याने या फ्लेव्हरची तुलना गुजराती गोड पदार्थाशी केली आहे. आम्ही क्रिएटर प्रमोशन करतो, पण मी डिमोट करत आहे असंही त्याने यात सांगितलं आहे. इतकंच नाही तर हे कचऱ्यात टाकण्याच्या लायकीचं आहे असंही तो सांगतो. 

 
 
 
 

 
 
 
 

A post shared by Zervaan J Bunshah (@bunshah)

हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून 5.7 मिलियन व्ह्यू मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहे. काहींनी लेज इंडियाला कमेंटमध्ये टॅग केलं असून जुनं मॅजिक मसाला परत आणण्याची विनंती केली आहे. लेजने अखेर झेरवानाला डीएम करत उत्तर दिलं आहे. त्याने या उत्तराचा स्क्रीनग्रॅब शेअर केला आहे. 

"मॅजिक मसाला तुमचा आवडता आहे आणि तुम्हाला ते मॅजिक परत हवं आहे हे मी समजू शकतो. हे एक लिमिटेड एडिशन होतं. आम्हाला ग्राहकांच्या आयुष्यात अजून आनंद आणायचा आहे. त्यामुळे चिंता करु नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मॅजिक मसाला पुन्हा येत आहे," असं लेजने म्हटलं आहे. 

दरम्यान याचा फायदा बिंगोनेही घेतला आहे. थेट झेरवानचा उल्लेख करत शेअर केलेल्या व्हिडीओत त्यांनी त्याची चव भागवण्यासाठी विशेष ऑफर दिली आहे. कंपनीने थेट त्याला ट्रकभरुन बिंगो हॅशटॅग स्पायसी मसालाचे पॅकेट्स पाठवले आहेत.

यातील प्रत्येक चिप स्पायसी असून, अजिबात गोड नाही असंही त्यातील व्यक्ती सांगतो.