सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी सिंधुदूर्ग सत्र न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे अद्यापही फरार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर संतोष परब यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत आमदार नितेश राणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांच्यावर हल्लाचे आरोप केले होते.
या हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांचं नाव आल्यानं आपणास अटक होण्याची शक्यता लक्षात घेता नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तीन दिवसांच्या सुनावणीनंतर सिंधुदूर्ग सत्र न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळला होता.
संतोष परब हल्ला प्रकरणात पोलिसांनी नितेश राणे यांना तीन वेळा चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, ते गैरहजेर राहिले. नितेश राणे हिवाळी अधिवेशनासाठी हजर राहिले तर त्यांना अटक करण्याची तयारीही पोलिसांनी केली होती.
मात्र, नितेश राणे हे फरार झाले होते. नितेश राणे गोव्यात लपले असण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलिस आणि महाराष्ट्र पेलिसांचे विशेष पथकाने गोव्यात अनेक ठिकाणी सापळा रचला आहे अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, सिंधुदूर्ग सत्र न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणेंनी हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र, त्यावरील सुनावणी अद्याप बाकी आहे.