सिंधुदुर्ग: कणकवली मतदारसंघात शिवसेनेकडून सतीश सावंत यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे सिंधुदुर्गातील वातावरण तापले आहे. त्यामुळे आता सिंधुदुर्गात भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून शिवसेनेशी झालेली अधिकृत युती तोडण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी तर थेट नितेश राणे किंवा शिवसेनेतील बंडखोर राजन तेली यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता शिवसेनाही भाजपविरोधात जाहिररित्या दंड थोपटणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव असला तरी राज्यातील इतर कोणत्याही मतदारसंघांमध्ये हे दोन्ही पक्ष अधिकृतपणे एकमेकांविरोधात उभे ठाकलेले नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या धुसफुसीमुळे राज्याच्या इतर मतदारसंघातही शिवसेना-भाजपमधील राजकीय समीकरणे बदलणार का, हे पाहणेदेखील औत्स्युक्याचे ठरेल.
भाजपने शिवसेनेचा विरोध डावलून नितेश राणे यांना उमेदवारी दिल्यामुळे कणकवली मतदारसंघ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला शिवसेनेकडून सातत्याने विरोध सुरु होता. त्यामुळे भाजपने युतीची घोषणा होण्यापूर्वी राणे यांना भाजपमध्ये प्रवेश देणे टाळले होते. मात्र, बुधवारी सिंधुदुर्गात भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत अचानकपणे नितेश राणे यांचा छोटेखानी प्रवेश सोहळा पार पडला होता. त्यावेळी भाजपकडून नितेश यांना एबी फॉर्मही देण्यात आला होता. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
अखेर शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेकडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातून बाहेर पडलेल्या सतीश सावंत यांना एबी फॉर्म देण्यात आला. यानंतर सतीश सावंत यांनी कणकवलीतून अखेरच्या क्षणी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता ते शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर म्हणजे धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे कणकवली मतदारसंघाची लढत दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.