अलिबाग: रायगड किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामात बाबुगिरी आणि खाबुगिरीचा शिरकाव झाल्याचा आरोप खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. या सगळ्यासंदर्भात योग्य ती पावले न उचलली गेल्यास भविष्यात आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही यावेळी संभाजीराजे यांनी दिला. ते शुक्रवारी रायगड प्राधिकरणाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले की, रायगड संवर्धनाच्या कामात खाबुगिरी आणि बाबुगिरीचा शिरकाव झाला आहे.
रायगडच्या संवर्धनासाठी शासनाचा ६०० कोटींचा आराखडा
प्राधिकरणाच्या माध्यमातून होणारी कामे पुरातत्व विभागाकडून रोखली जात आहेत. महाड ते पाचाड मार्गाच्या कामात टक्केवारी घेतली जाते. हा नियम रोप-वे वाल्यांना लागू होत नाही. प्राधिकरण तसेच संबंधित यंत्रणांची कुठलीही परवानगी न घेता रायगड रोप-वेच्या संचालकांकडून विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात आले. रोप-वेचा असाच मनमानी कारभार चालणार असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
तसेच महाड ते पाचाड दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम रखडल्यावरूनही संभाजीराजेंनी प्रशासनावर ताशेरे ओढले. निविदाप्रक्रिया पूर्ण होऊन दोन वर्ष उलटली तरी ठेकेदाराकडून काम सुरु करण्यात आलेले नाही. या कामात दोन उपकंत्राटदार नेमण्याचा घाट महामार्ग प्राधिकरणाने घातला आहे. टक्केवारी मिळवण्यासाठी हे सगळे सुरु आहे. हा प्रकार बिलकूल खपवून घेतला जाणार नाही, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
तत्पूर्वी संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्ट लिहूनही आपली नाराजी व्यक्त केली होती. रायगडच्या संवर्धनासाठी रायगड विकास प्राधिकरण काम करते. गडकिल्ल्यावर भ्रमंतीसाठी येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना सोयीसुविधा देण्यासाठी किंवा संवर्धनाच्या कामासाठी काही करायचे झाल्यास पुरातत्व खात्याकडून सातत्याने आडकाठी केली जाते. नियमांवर बोट ठेवून कामांना स्थगिती दिली जाते. मग 'रोप वे'साठी रायगड विकास प्राधिकरणाला न विचारता परवानगी दिलीच कशी गेली? अशा बेकायदा कामांना चाप लावण्यासाठी संबंधितांवर गुन्हे का दाखल केले गेले नाही, असा सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी विचारला होता.