कणकवली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर टीकास्त्र सोडणारे भाजप नेते नारायण राणे यांना शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा म्हणजे पर्यटन दौरा होता. यामधून कोकणवासियांना काहीच मिळाले नसल्याची टीका राणे यांनी केली होती. राणे यांच्या या टीकेला बुधवारी खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी कोकणाला भरभरून दिल्यामुळेच नारायण राणे यांचा जळफळाट होत असल्याचे राऊत यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा कमालीचा यशस्वी झाला असून ही बाब न पचल्यानेच राणे कोकणच्या विकासकामांत खोडा घालण्याचे काम करत आहेत. मात्र, राणेंनी कितीही आडकाठी आणली तरी कोकणचा विकास आता थांबणार नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सर्व प्रकल्प वेळेतच मार्गी लागतील, असा दावा राऊत यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या दोन दिवसीय कोकण दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासकामे, प्रकल्प आणि विविध योजनांचा आढावा घेतला होता. मी स्वप्न दाखवत नाही, ती पूर्ण करतो. आमचे सरकार आकडा सांगण्यापेक्षा कृतीला महत्व देणारे आहे. त्यामुळे आपणास जी विकासकामे करायची आहेत, त्या कामांबाबत आराखडे सादर करा. निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी कोकणवासियांना दिले होते.
मात्र, नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंचा हा दावा खोडून काढत ही केवळ घोषणबाजी असल्याचे म्हटले होते. या सगळ्यातून कोकणवासियांना काहीच मिळणार नाही. किंबहुना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य अधोगतीकडे चालले आहे, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली होती. परंतु, विनायक राऊत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. चिपी विमानतळ आणि सी-वर्ल्ड हे प्रकल्प रखडण्यास नारायण राणेच जबाबदार आहेत. कोकणातील अनेक छोटे-मोठे प्रकल्प राणेंच्या काळात पूर्ण झाले नाहीत. काही प्रकल्पांची तर कामेही सुरू झाली नाहीत. हे प्रकल्प आजच्या मुख्यमंत्र्यांमुळे मार्गी लागत असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.