Chandrayaan-3 Landing Impact On Share Market: चांद्रयान-३ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिग केले आहे. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.04 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडर उतरले. भारताने आणखी एका यशाला गवसणी घातली आहे. चांद्रयाननच्या सॉफ्ट लँडिगनंतर शेअर बाजारातही तेजी आली आहे.
चांद्रयानच्या यशस्वी लँडिगनंतर या आठवड्यात चारच दिवसात अंतराळासंबंधीत 13 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. या कंपन्यांनी 30,700 कोटींपर्यंत झेप घेतली आहे. इस्रोचे क्रिटिकल मॉड्युल्स आणि सिस्टिम सप्लाय करणाऱ्या सेंटम इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्समध्ये या आठवड्यात 26 टक्क्यांची तेजी आली आहे. त्याचबरोबर, Avantel, Linde India, पारस डिफेंस आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच्या शेअरमध्येही दुपटीने उसळी आली आहे. चांद्रयान-3च्या या प्रवासात इस्रो व्यतिरिक्त अनेक कंपन्यांची महत्त्वाची भूमिका बजावली होती.
चांद्रयान-3 मिशनमध्ये योगदान देणाऱ्या कंपन्यांची यादी मोठी आहे. यात खासगी कंपन्यांसह सरकारी कंपन्यांचाही समावेश आहे. लार्सन अँड टुब्रोने सबसिस्टम बूस्टर सेगमेंटचे उत्पादन आणि चाचणी केली, तर मिश्र धातू निगमने कोबाल्ट बेस मिश्र धातु, निकेल बेस मिश्र धातु, टायटॅनियम मिश्र धातु आणि विशेष स्टील्स यासारख्या महत्त्वपूर्ण सामग्रीचा पुरवठा केला.
PTC इंडस्ट्रीजने चांद्रयान-3 साठी पंप इंटरस्टेज हाऊसिंगचा पुरवठा केला तर एमटीएआर टेक्नॉलॉजिजने इंजिन आणि टर्बो पंप आणि बूस्टर पंपसह क्रायोजेनिक इंजिन उपप्रणाली यासारखी उपकरणे पुरवली. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीजने चंद्रयान-३ करिता नेव्हिगेशन सिस्टमचा पुरवठा केला. हिंदुस्तान एरोनॉटिक्सचंद्र मोहिमेसाठी यांत्रिक उत्पादने पुरविली आहेत.
चांद्रयान-3 च्या यशानंतर अनेक देशांनी अंतराळ क्षेत्रात भागीदारीसाठी भारताशी संपर्क साधला आहे. यामध्ये सौदी अरेबिया, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाचा समावेश आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी या माहितीला दुजोरा देत म्हटलं आहे की, अनेक देशांनी अवकाश क्षेत्रात भागीदारीसाठी भारताशी संपर्क साधला आहे. मात्र, याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. गोयल म्हणाले, यामुळे वैज्ञानिक शोधासाठी नवीन संधी उपलब्ध होतील. भारत जगातील अंतराळ समुदायामध्ये मोठे योगदान देईल.