मुंबई : राज्यातील १२१ मदरशांमधील शिक्षकांच्या वेतनासाठी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. हा निधी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे, असे मलिक यांनी सांगितले.
मदरशांमधील विद्यार्थ्यांना क्रमिक अभ्यासक्रमातील गणित, विज्ञान, समाजशास्त्र, भाषा इत्यादी विषयांचे शिक्षण देण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना क्रमिक अभ्यासक्रम शिकण्यास व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास या योजनेतून प्रोत्साहन देण्यात येते. या योजनेतून संबंधित मदरशामध्ये पायाभूत सुविधा, ग्रंथालय तसेच क्रमिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शिक्षकास मानधन देण्यात येते. तसेच मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मदरशांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत राज्यातील १२१ मदरशांमधील शिक्षकांच्या वेतनासाठी १ कोटी ८० लाखांचा निधी देणार. धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना क्रमिक अभ्यासक्रम शिकण्यासह समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास या योजनेतून प्रोत्साहन- अल्पसंख्याक विकास मंत्री @nawabmalikncp pic.twitter.com/AONoAwrFh2
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 23, 2020
या योजनेमधून ठाणे जिल्ह्यातील १३ मदरशांसाठी १८ लाख रुपये, वाशिम जिल्ह्यातील १२ मदरशांसाठी २१ लाख रुपये, बुलडाणा जिल्ह्यातील २ मदरशांसाठी १ लाख ४० हजार रुपये, औरंगाबाद जिल्ह्यातील ८० मदरशांसाठी १ कोटी १६ लाख ४० हजार रुपये, जालना जिल्ह्यातील ७ मदरशांसाठी १३ लाख ८० हजार रुपये, परभणी जिल्ह्यातील ३ मदरशांसाठी ४ लाख ८० हजार रुपये, हिंगोली जिल्ह्यातील एका मदरशासाठी १ लाख २० हजार रुपये तर वर्धा जिल्ह्यातील ३ मदरशांसाठी ४ लाख रुपये असे एकूण १ कोटी ८० लाख ६० हजार रुपये अनुदान हे शिक्षकांच्या मानधनासाठी वितरित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून निधी लवकरच वितरित होईल, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.