मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या 23 हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत 1200 हून अधिक नवीन वाढले आहेत. विशेष गोष्ट अशी आहे की, गेल्या 24 तासांत 221 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत एक हजाराहून अधिक पोलीस महाराष्ट्रात कोरोनाबाधित झाले आहेत. तर आतापर्यंत 7 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे.
ताज्या माहितीनुसार महाराष्ट्रात 1007 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 106 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एकट्या मुंबईतच जवळपास 400 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यांमधील पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय रिझर्व्ह फोर्सच्या जवानांनाही संसर्ग झाल्याचे आढळले आहे.
कोरोनामुळे महाराष्ट्रातील 7 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात मुंबई पोलिसांचे चार, पुणे पोलिसांचा एक, सोलापूर पोलिसांचा एक आणि नाशिक ग्रामीणचा एक पोलिसाचा समावेश आहे. सध्या हजारो पोलीस क्वारंटाईन आहेत. तर 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पोलिसांना घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्राप्रमाणेच दिल्ली पोलिसातही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत 135 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. सोमवारी दिल्ली पोलिसांच्या एएसआयमध्ये कोरोनाची पुष्टी झाली.
निमलष्करी दलांमध्ये ही कोरोनाचा धोका वाढत आहे. आतापर्यंत 750 अर्धसैनिक जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. सीआरपीएफ 236, बीएसएफ 276, आयटीबीपी 156, सीआयएसएफ 64, एसएसबी 28 जवान कोरोना बाधित झाले आहेत. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पॅरामिलिट्रीच्या जवानांना एअरलिफ्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.