Kolhapur News: संपूर्ण राज्यात मंगळवारी दत्त जयंतीचा उत्साह होता. अनेकांनी उत्साहात दत्त जयंती साजरी केली. पण यादरम्यान कोल्हापुरात मात्र एका मुलाची चर्चा रंगली होती. यामागे एक अजब कारण होतं. कारण त्याच्या आई-वडिलांनी आमच्या पोटी स्वामी समर्थ जन्माला आले आहेत असा दावा केला होता. ते इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी आपल्या मुलाला भगवे कपडे घालून गादीवर बसवलं. यानंतर त्यांनी चक्क दरबारच भरवला होता. तसंच महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर पोलिसांनीही या घटनेची दखल घेतली असून दांपत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
इंद्रायणी हितेश वलादे आणि हितेश लक्ष्मण वलादे असं या दांपत्याचं नाव आहे. त्यांनी आपला 15 वर्षीय मुलगा स्वामींचा अवतार असल्याचा दावा करत दरबार थाटला होता. गेल्या सहा महिन्यांपासून कसबा बावडा येथील राम चौगुले कॉलनीत हा प्रकार सुरु होता. त्यांच्याविरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरु आहे.
इंद्रायणी आणि हितेश वलादे यांनी ‘श्री बाल स्वामी समर्थ’ नावाने मुलाची ओळख तयार केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे अनेकजण त्याचे भक्तही झाले होते. दत्त जयंतीला कसबा बावडा येथे भव्य पारायण करत आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन केले होते. या कार्यक्रमात लोकांनी गर्दी केली होती. इतकंच नाही तर महाप्रसादासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले होते.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता वस्तुस्थिती समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "वालदे दांपत्य मूळचे गडचिरोलीचे असून किरण पालकर यांच्या घऱी भाड्याने राहतं. आपला मुलगा स्वामींचा अवतार असून त्याच्या अंगात दैवी शक्ती असल्याचं सांगत होते. ते लोकांना पाच गुरुवार दर्शनासाठी येण्याचं आवाहन करत होते. त्यांनी बालस्वामी समर्थ भक्त मंडळाचीही स्थापना केली होती".
मुक्ता दाभोलकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, "यामध्ये मुलाचे आई-वडीलही सहभागी झाल्याने हे मानवी हक्कासह बालहक्काचंही उल्लंघन आहे. गरज पडल्यास बालहक्क आयोगाकडे दाद मागायला हवी. कोणाचा तरी अवतार असल्याचं सांगत दिशाभूल करणं गुन्हा आहे".