प्रत्येक नुकसानग्रस्ताला मदतीचा हात, सरकार शंभर टक्के पाठिशी, अजित पवार यांचं आश्वासन

'आम्ही कुठेही गेलो तर जनता काही सांगत असते. त्यावेळेस त्यांचं ऐकायचं असतं', भास्कर जाधव यांना टोला

Updated: Jul 26, 2021, 05:34 PM IST
प्रत्येक नुकसानग्रस्ताला मदतीचा हात, सरकार शंभर टक्के पाठिशी, अजित पवार यांचं आश्वासन title=

सांगली : मुसळधार पावसाने महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. विशेषत: रायगड, सांगली, सातारा या भागात प्रचंड नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त भागाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी दौरा करतायत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगलीत पूरग्रस्त भागाचा दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला

पुरामुळे, अतिवृष्टीमुळे तसंच दरड कोसळून झालेल्या प्रत्येक बांधवाला मदतीचा हात दिला जाईल, सरकार शंभर टक्के त्यांच्या पाठिशी आहे, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील नुकसानीचा आढावा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला जाईल यानंतर महाविकास आघाडी सरकार सर्वोतोपरी मदत करेल, नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरु ठेवा, ते थांबवू नका अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. 

कोयना धरणात पहिल्यांदाच एका दिवसात साडे सोळा टीएमसी पाणी जमा झालंय. त्याचीच किंमत आपल्याला मोजावी लागली. शेतकरी, व्यापारी, मजूर यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या ऐकून घेतल्या जातील. संकटात सापडलेल्या प्रत्येकाला मदत दिली जाईल. मुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री सातत्याने आढावा घेत आहेत. केंद्राकडून राज्याला मदत करण्याचं काम सुरु आहे. केंद्र आणि राज्यात चांगला समन्वय सुरु आहे. राज्य सरकार कुठेही मागे हटणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी पूरव्यवस्थापन करणारी यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल, तोक्ते चक्रीवादळ किंवा निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना सर्व नियम बाजूला ठेवून अडीचपट जास्त मदत दिली, आताही शक्य ती मदत दिली जाईल असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं.

अजित पवार यांचा भास्कर जाधव यांना टोला

आम्ही कुठेही गेलो तर जनता काही सांगत असते. त्यावेळेस त्यांचं ऐकायचं असतं, असा टोला अजित पवार यांनी भास्कर जाधव यांना लगावला आहे. लोकप्रतिनिधी खासदार, आमदार आणि मुख्यमंत्री कुठेही गेले तर जनतेचं म्हणणं ऐकून घेणं आमचं कर्तव्य आहे. ते पार पाडलं पाहीजे, असं अजित पवार यांनी सांगितलं.