तळीये गाव होत्याचं नव्हतं झालं, ग्रामस्थांच्या विनवणीनंतर शोध कार्य थांबवलं

दरड कोसळून महाड तालुक्यातील तळीये गावातील जवळपास 35 घरं ढिगाऱ्याखाली गाढली गेली, कालपर्यंत दिसणाऱ्या गावाचं आता अस्तित्वच नष्ट झालं आहे.

Updated: Jul 26, 2021, 03:43 PM IST
तळीये गाव होत्याचं नव्हतं झालं, ग्रामस्थांच्या विनवणीनंतर शोध कार्य थांबवलं title=

रायगड : रायगडच्या महाडमधील तळीयेतील शोधकार्य आता थांबवण्यात आलंय. याबाबत ग्रामस्थांनी मागणी केली होती. आतापर्यंत 53 मृतदेह सापडलेत, तर 31 जण बेपत्ता आहेत. तळीये गावात आज ग्रामस्थांकडून शोकसभेचंही आयोजन करण्यात आलंय. SDRFच्या सर्व यंत्रणा परतल्यात. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीही याला दुजोरा दिलाय. पण काहीजण अजूनही बेपत्ता असल्याने नातलगांची अवस्था मात्र बिकट झाली आहे. 

तळीये गावातील ग्रामस्थांनी मृतदेहांची अधिक विटंबना न करता जे बेपत्ता आहेत त्यांना मृत घोषित करुन मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर दस्ताऐवजांची पूर्तता शासनाने करावी अशी मागणी केली होती. 

महाडमधील तळीये गावाचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. डोंगर कोसळ्याने काही क्षणांत अनेकांचे संसार चिखलात रुतून गेले. गेल्या दोन दिवसांपासून एनडीआरएफच्या टीमकडून युद्धपातळीवर बचावकार्य केलं जात होतं.
 
कोकणात गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने महाड तालुक्यातील तळीये गावावर 22 जुलैला दुपारी 4  वाजता डोंगरकडा कोसळला. यात तळीये गावातील जवळपास 35 घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली. तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत होता. त्यानंतर गेले दोन ते तीन दिवस एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू होतं.