सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात? मुंबई हायकोर्टाने बजावली नोटीस; नेमकं प्रकरण काय?

Suresh Dhas Court Case: मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणानंतर सातत्याने प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत असलेलं नाव म्हणजे भाजपाचे आमदार सुरेश धस

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 22, 2025, 01:41 PM IST
सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात? मुंबई हायकोर्टाने बजावली नोटीस; नेमकं प्रकरण काय?
सुरेश धस यांनीही यावर नोंदवली प्रतिक्रिया (प्रातिनिधिक फोटो)

Suresh Dhas Court Case: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणानंतर वारंवार कठोर कारवाईची मागणी करणारे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस हेच आता अडचणीत आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आमदार सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरेश धस यांच्या निवडीला आव्हान देण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावरून आमदार सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आली आहे. सुरेश धस यांनी निवडणुकीदरम्यान नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. शासकीय कर्मचा-यांवर दबाव टाकून मतदान करण्यास सांगितल्याचाही आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याप्रकरणी आता 5 मार्चला सुनावणी होणार आहे.

काय आहे याचिका?

सुरेश धस हे विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर लढून विजयी झाले होते. त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढविलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) पक्षाचे महेबुब इब्राहिम शेख यांनी निवडणुकीसंदर्भातील याचिका दाखल केली आहे. धस यांनी धार्मिक कारणावरून मतं मागितली, असं या याचिकेमध्ये म्हटलं आहे. मतदानाच्या दिवशी मतदानाचे व्हिडीओ व्हायरल केले गेले. शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करून घेतले. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मागणी करून देखील फॉर्म '17 सी'ची प्रत त्यांना दिली नाही. निवडणूक प्रक्रियेची केलेली व्हिडीओग्राफी, तसेच सीसीटीव्ही फुटेज यांची मागणी करण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच ईव्हीएम मशिनवरील सुरक्षा संशयास्पद होती. निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीनवरील सीलवर स्वाक्षरी केली नाही, असा आरोपही करण्यात आला आहे.

न्यायमूर्ती अभय वाघवसे यांनी दिले आदेश?

शरद पवारांच्या पक्षाचे पराभूत उमेदवार महेबूब इब्राहिम शेख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय वाघवसे यांनी आमदार धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. याचिकाकर्त्यांनी निवडणुकीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे सांगत सुरेश धस यांची निवडणूक रद्दबातल करण्याची मागणी केली आहे. पुढील सुनावणी 5 मार्च रोजी होणार आहे.

नक्की वाचा >> महिलेला 'तू मला आवडतेस' असा मेसेज करणं विनयभंगच; कोर्टाचा निर्णय, मुंबईकराला तुरुंगवास

या प्रकरणावर धस काय म्हणाले?

या प्रकरणावर सुरेश धस यांनीही पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. "आष्टी मतदारसंघातील 440 बुथवर असा कोणताही प्रकार झाला नाही. मेहबूब शेख यांनी तक्रार मतदानाच्या दिवशी करायला पाहिजे होती. नंतर केलेल्या तक्रारीला महत्व नाही," असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.