Kalyan Lift Accident : सहा महिन्याचे बाळ लिफ्टमध्ये अडकल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याण मधील एका हाऊसिंग सोसायटीत हा प्रकार घडला. लिफ्टचा दरवाजा उघडत नव्हता. अखेरीस अग्मीशन दलाच्या जवानांच्या मदतीने या बाळालाची सुखरुप सुटका करण्यात आली. लिफ्ट बंद पडल्याने बाळ अडकले होते. जवळपास अर्धा तास हे बाळ लिफ्टमध्ये अडकले होते. बाळासह पंधरा वर्षाच्या मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
कल्याण पश्चिम भागातील रौनक सिटी भागातील एका प्रसिद्ध गृहसंकुलात हा प्रकार घडला आहे. येथील वीज पुरवठा अचानक खंडित झाला होता. त्यामुळे लिफ्टला विद्युत पुरवठा न मिळाल्याने लिफ्ट मध्येच बंद पडली. यावेळी एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि तिच्या सोबत सहा महिन्याचे बाळ लिफ्ट मध्ये अडकले.
बाळ आणि 15 वर्षाची मुलगी लिफ्टमध्ये अडकल्याचे सोसायटीच्या सदस्यांना समजले. त्यांनी या दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, लिफ्टचा दरवाजा उघडत नव्हता. अखेरीस सोसायटीच्या सदस्यांनी ही माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. अग्नशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी हायड्रोलिक कटरच्या मदतीने लिफ्टचा दरवाजा तोडून या दोघांना सुखरूप बाहेर काढले.
लिफ्ट मध्ये अडकून एका सात वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वसई पूर्वेच्या सातीवली येथील डायस रेसिडेन्सी मध्ये घडली होती. अंशकुमार गौड नावाच्या मुलाचा या घटनेत मृत्यू झाला. अंश इमारतीच्या लिफ्टमध्ये आपल्या दोन मित्रांसोबत खेळत असताना, अचानक लिफ्ट पहिल्या मजल्यावर मध्येच बंद पडली. त्यानंतर घाबरलेल्या अंशनं बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आपला पाय बाहेर काढला आणि तितक्यात लिफ्ट सुरू झाली. त्यामुळे लिफ्टच्या दारात पाय अडकल्यामुळे तो दरवाजा सोबत खेचला गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. गेल्याकाही वर्षांपासून इमारतीची लिफ्ट खराब होती. याबबत बिल्डरकडे अनेकदा तक्रार करूनही याकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आलं. बिघडलेल्या लिफ्टमुळे चिमुकल्या अंशचा जीव गेल्यामुळे संतप्त नागरीकांनी आता बिल्डवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
खेळता खेळता लिफ्टमध्ये गेल्यानंतर अचानक दरवाजा बंद होऊन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना संभाजीनगरमध्ये घडली होती. साकीब सिद्दीकी असं मृत 13 वर्षांच्या मुलाचं नाव आहे. ही घटना इतकी भीषण होती की लिफ्टच्या गेटमध्ये मुलाचा अर्धाअधिक गळा कापला गेला होता.