Maharashtra NCP Crisis : राष्ट्रवादीचा एक मोठा गट भाजप आणि शिंदे गटासह सरकारमध्ये सामील होत सत्तेत सहभागी झाला. 2 जुलै रोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथ विधीनंतर शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. राष्ट्रवादीला सरकारमध्ये घेतल्याने शिंदे गटामध्ये नाराजी पसरली आहे. शिंदे गटासोबत असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीला सरकारमध्ये आम्हाला विश्वासात घेतलं नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी खदखद बोलून दाखवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सोबत घेतांना त्यांच मंथन आणि चिंतन व्हायला पाहिजे होते. प्रत्यक्षात मात्र, विचारात आणि विश्वासात न घेता राष्ट्रवादीला सोबत घेतलं असा दावा शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. राष्ट्रवादीला सरकारमध्ये सोबत घेतल्याने आता एकनाथ शिंदे सोबत असणाऱ्या सर्व आमदारांची गोची झाली आहे असा दावा देखील बच्चू कडू यांनी केला आहे.
महाविकासआघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीचा त्रास होत होता. काम होत नव्हती. शिवसेनेचे मतदार संघ फोडून त्यांच्या मतदारसंघाची बांधणी होत होती असा आरोप केला जात होता. मात्र, त्या आरोपाला आता छेद लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर, ज्यांनी हा उठाव केला त्यांनीच आपल्या डोक्यावर ही कुऱ्हाड मारून घेऊ नये. त्यांचं आयुष्य पणाला लावता कामा नये. सत्तेसाठी काही पण असं होऊ नये याची आम्हाला अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी आहे आणि भाजपची विचार धारा वेगळी आहे. ही जी विचाराची विभागणी झाली याच दुःख शरद पवार यांना असेलच. या वेदना लहान नाहीत. आम्ही त्यांचं सांत्वन करतो. सर्वात आधी उठाव उद्धव ठाकरे यांनी केला. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यानंतर आता अजित पवार यांनी केला. या सर्व उठावाचे भीष्म पितामहा शरद पवार आहेत. हे बंड शरद पवार यांच्यासाठी नवीन नाही मात्र अजित दादा यांनी घेतलेल पाऊल हे अभिनंदनीय आहे असेही बच्चू कडू म्हणाले.