Pune Crime News: पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र, याच पुण्यात अंधश्रद्धेला बळी पडून गुन्हे घडत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. पुण्यातील मध्यवर्ती असलेल्या नारायण पेठेत अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पाण्याच्या टाकीत पैसे टाकल्यास त्याचे 20 पट होतील, असं म्हणत पुण्यातील एका महिलेला 20 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच 41 वर्षांच्या महिलेची पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. (Pune News Today)
पाण्याच्या टाकीत पैसे टाका, २० पट करून देतो तसंच रूम मध्ये धूर करून, पूजा करतो तसच २० लाखांचे १२ दिवसात ५ कोटी होतील या अमिषाला ही महिला बळी पडली. मात्र आपली फसवणूक झाल्याचे कळताच तिने पोलिस ठाणे गाठून तन्वीर पाटील, शिवम गुरुजी, सुनील राठोड, आनंद स्वामी अशा ४ जणांवर तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरुन विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे व्यावसायिक भागीदार यांच्या प्लॉटच्या व्यवहारानिमित्त दोन महिन्यांपूर्वी तन्वीर पाटील यांच्यासोबत ओळख झाली होती. पाटील यांनी इतरा तिघांसोबत संगनमत करून तिघांना वीस लाख रुपयांचे पाच कोटी रुपये करून देतो असे आमिष दाखवले. या भूलथापाला बळी पडत या तिघांनी वीस लाख रुपये जमवले.
आरोपींनी 13 सप्टेंबर रोजी 200 लिटरच्या बॅरेल मध्ये वीस लाख रुपये टाकण्यास सांगितले आणि त्यानंतर त्या रूमची लाईट बंद करून त्या ठिकाणी आरोपींनी मोठ्याप्रमाणात धूर केला. तसंच, महिलेला हरिद्वार येथे जाऊन पूजा करण्यास सांगितलं. तिथली पूजा करुन आल्यानंतर या वीस लाख रुपयांचे बारा दिवसांतच पाच कोटी होतील, असं सांगितले. मात्र, त्यानंतर हे चारही जण वीस लाख रुपये घेऊन निघून गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.