Abhishek Ghosalkar Latest News: माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर बोरिवलीच्या आय सी कॉलनीमधील रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे. कोरोना कालावधीमध्ये या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात समाजसेवा करणाऱ्या मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने घोसाळकरांवर 5 गोळ्या झाडून त्यांची हत्या करुन आत्महत्या केली. मात्र असं काही आपल्या परिसरात घडेल यावर स्थानिकांचा विश्वास बसत नाहीये. पण समाजसेवा करणारी व्यक्ती आणि माजी नगरसेवकामध्ये इतकं कोणतं वितुष्ट निर्माण झालं की एकाने दुसऱ्याचा जीव घेऊन आत्महत्या केली अशी चर्चा सुरु आहे. तरीही या परिसरात राहणाऱ्या अनेकांना या दोघांच्या वादाबद्दल पूर्व कल्पना होती.
महिन्याभरापूर्वी दोघे एकत्र आले होते
अवघ्या एका महिन्यापूर्वीच विनोद घोसाळकर आणि मॉरिस नारोन्हा हे दोघे एकत्र आले होते. पण मॉरिसने विनोद घोसाळकरवर गोळीबार केल्याची बातमी गुरुवारी रात्री वाऱ्याच्या वेगाने पसरली. जखमी अवस्थेत घोसाळकरांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळताच स्थानिकांची या रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमली. कुठलाही अनुचित प्रकार घढू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. रुग्णालयाबाहेर ठाकरे गटाच्या संतप्त शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात घोषणाबाजीही केली.
कोरोना योद्धा म्हणून अनेक पुरस्कार
राजकीय वैमनस्यातून मॉरिसने घोसाळकरांवर गोळीबार केल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. मॉरिस नरोन्हा हा मागील अनेक वर्षांपासून परदेशामध्ये वास्तव्यास होता. कोरोनाच्या लाटेआधी म्हणजेच 2019 च्या डिसेंबर महिन्याआधी तो आय सी कॉलनीमध्ये परतला होता. कोरोना काळात त्याने मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य केलं. अनेकांना अगदी अन्नधान्य वाटण्यापासून ते बेड्स उपलब्ध करुन देण्यात मदत करण्याचं काम त्याने केलं. त्याच्या या कार्यसाठी त्याला कोरोना योद्धा म्हणून अनेक पुरस्कारही मिळाली. तो स्थानिकांमध्ये या कामामुळे लोकप्रिय झाला.
नक्की वाचा >> 'घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला CM शिंदेंनी दिलेली पक्ष प्रवेशाची ऑफर'; '4 दिवसांपूर्वीच..'
राजकीय महत्त्वकांशा
मॉरिसच्या राजकीय महत्त्वकांशा काही लपून पाहिेले नव्हत्या. राजकारणामध्ये प्रवेश करण्याची त्याची इच्छा होती. त्याचे स्थानिक स्थरावर सर्व पक्षीय नेत्यांशी चांगले संबंध होते. त्याने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली होती. जागोजागी त्याचे फलक लावण्यात आले होते. मॉरिसने निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केल्याने अभिषेक घोसाळकर यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याची चर्चा होती. तेव्हापासूनच दोघांमध्ये राजकीय वैमनस्य निर्माण झालं होतं.
नक्की वाचा >> मृत्यूआधी आदित्य ठाकरेंना भेटलेले घोसाळकर! जाहीर सभेत आदित्य म्हणाले, 'आता 5 वाजता...'
बालात्कार प्रकरण
दरम्यान, मध्यंतरी मॉरिस जवळपास साडेचार महिने बलात्काराच्या गुन्ह्यात तुरुंगात राहून आला होता, अशी माहिती त्याच्या घटस्फोटीत पत्नीने दिली आहे. "जामीनावर तुरुंगातून सुटून घरी आल्यानंतर मॉरिस सारखा, 'मी अभिषेक घोसाळकरला सोडणार नाही. मारून टाकणार!' असं बोलायचा," अशी माहितीही मॉरिसच्या पत्नीने दिल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. घोसाळकरांमुळे आपण बलात्कार प्रकरणात आल्याची चीड मॉरिसच्या मनात होती अशी चर्चा स्थानिक स्तरावर लपून राहिलेली नाही. या चर्चा आता पुन्हा येथील स्थानिकांमध्ये रंगल्या आहेत.
नक्की वाचा >> तो फोन कॉल, ऑफिसमधले लाईट्स गेले अन्..; Eyewitness ने सांगितला घोसाळकरांवरील गोळीबाराचा थरार
एकाच बॅनरवर दोघांचे फोटो
एकीकडे हा संघर्ष सुरु असतानाच दुसरीकडे आयसी कॉलनीमध्ये कामाचे श्रेय घेण्यावरुन मॉरिस आणि घोसाळकरांमध्ये चढाओढ सुरु होती. मॉरिसच्या फलकांविरोधात अभिषेक यांनी तक्रारही केली होती. या दोघांमधील राजकीय वैमनस्य सर्वश्रृत होतं. मात्र नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात लागलेल्या फलकांवर मॉरिस आणि घोसाळकर या दोघांचे फोटो छापण्यात आल्याने दोघांमध्ये समेट झाल्याची चर्चा होती. हे बॅनर्स पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होती. हे फोटो सोशल मीडियावरही या गोळीबार प्रकरणानंतर व्हायरल झालेत. सारे काही अलबेल सुरु असतानाच आता ही घटना घडल्याने आश्चर्य वाटत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.