सासवड : सासवड इथल्या पुरंदर विद्यापीठावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. सासवड इथे अवघ्य़ा तीन खोल्यांमध्ये चालणा-या या बोगस विद्यापीठाची पोलखोल झी चोवीस तासने नोव्हेंबर मध्ये केली होती. तसंच या बाबतीत मानवी हक्क संरक्षण संस्थेने देखील तक्रार केली होती. मात्र तब्बल चार महिन्यांनतर जाग आलेल्या शिक्षण खात्यानं पुरंदर विद्यापीठावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशामध्ये विद्यापीठाविरोधात पोलिसात एफआरआय दाखल करण्याबाबतही सुचना दिल्या आहेत. दरम्यान बीए, बीकॉम, बीएसस्सी, बीई, डिप्लोमा एमबीए असे अनेक अभ्यासक्रम या विद्यापीठात परवानगीशिवाय चालवले जात होते मात्र या अभ्यासक्रमांसाठी आवश्यक कोणत्याही शैक्षणिक सुविधा इथे नव्हत्या. त्या बरोबरच टेक्निकल आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची(एआयसीटीईची) मान्यता घ्यावी लागते तीही पुरंदर विद्यापीठाकडे नाहीये.