अभिषेक अडेप्पा, झी मीडिया, सोलापूर : काही दिवसांपूर्वी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Solapur Market Committee) एका कांदा उत्पादक (Onion) शेतकऱ्याची क्रूर थट्टा केल्याचा प्रकार समोर आला होता. 10 पोती कांदे विकल्यानंतर सोलापुरमधल्या या शेतकऱ्याला चक्क दोन रुपये देण्यात आले होते. ही रक्कम चेकच्या माध्यमातून दिल्याने आणखी संताप व्यक्त करण्यात येत होता. यानंतर आता शेतकऱ्याला दोन रुपये देणाऱ्या व्यापाऱ्याला चांगलाच धडा शिकवण्यात आला आहे.
सोलापुरच्या बार्शी तालुक्यातील शेतकरी राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी 17 फेब्रुवारीला पाच क्विंटल कांदा सोलापूर मार्केट यार्डातील सुर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्याकडे विकला. मात्र गाडीभाडे, हमाली, तोलाई याचे पैसे वजा करुन शेतकऱ्याचा फक्त दोन रुपये मिळाले. धक्कादायक बाब म्हणजे सुर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्याने राजेंद्र चव्हाण यांना चेकच्यामाध्यमातून ही रक्कम दिली होती.
ही माहिती समोर येताच सर्वच स्तरातून रोष व्यक्त करण्यात येत होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रमुख राजू शेट्टी यांनी (Raju Shetti) ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा? एका बाजूला थकबाकी पोटी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन धडाधड तोडता आणि डोळ्या समोर पीक करपून जातं. राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये 10 पोती कांदे विकल्यावर त्याला किती पैसे आले. ते बघा निर्लज्ज व्यापार्याला दोन रूपयांचा चेक देताना लाज कशी वाटली नाही. व्यापारी शेतकऱ्यांना सांगतो 15 दिवसाने हा चेक वटेल, असे राजू शेट्टी यांनी म्हटले होते.
व्यापाऱ्यावर कडक कारवाई
दरम्यान, या सर्व प्रकारानंतर आता या व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने 23 फेब्रुवारी रोजी सूर्या ट्रेडिंग यांना नोटीस जारी करत खुलासा मागितला होता. मात्र समाधानकारक खुलासा न दिल्याने 24 फेब्रुवारीपासून पंधरा दिवसांसाठी संबंधित व्यापाऱ्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे