अहमदनगर : अहमदनगरमध्ये एका दाम्पत्याला विवस्त्र करून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. तक्रारदार महिलेनं मारहाण करणाऱ्यांवर २०१६ मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.
तो गुन्हा मागे घ्यावा यासाठी महिलेचे वडील, भाऊ, दीर आणि इतर नातेवाईकांनीच त्यांच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलंय. आरोपींनी दाम्पत्यावर पेट्रोल टाकत पट्ट्यानं बेदम मारहाण केली.
महिला आणि तिच्या पतीनं मारहाण करताना आवाज करू नये यासाठी कापडानं त्यांचे तोंडही बांधण्यात आलं होतं. एवढा अमानुष छळ करत असताना आरोपींनी या घृणास्पद घटनेचा मोबाईलनं व्हिडिओही काढला.
हा व्हायरल व्हिडिओ इतका भयंकर आहे की तो आमच्याकडे उपलब्ध असला तरी तो आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आलीय. यात तत्कालीन तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यालाही आरोपी करण्यात आलंय.
नगरच्या घटनेत कुटुंबातीलच सात जण आरोपी असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिलीय. या घटनेची आयपीएस अधिकऱ्याकडून महिनाभराच्या आत चौकशी केली जाईल अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुखांनी विधानसभेत केली.