Rohit Pawar Meet Ajit Pawar : अजित पवार आणि रोहित पवार या काका-पुतण्यात जवळपास दीड वर्षांत असा खुमासदार संवाद पाहायला मिळाला. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी रोहीत पवार कराडच्या प्रितीसंगमावर गेले होते. रोहित पवार तिथून परतत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार प्रितीसंगमावर आले होते.
यावेळी काका-पुतणे समोरासमोर आल्यावर काय होणार असा प्रश्न तेथील कार्यकर्त्यांच्या मनात होता. अजित पवार यांनी मात्र राजकीय अभिनिवेश बाजूला सारत रोहित पवार यांचा हात हातात घेतला. काकांच्या अधिकारवाणीनं पायापड असं देखील अजित पवार यांनी रोहित पवार यांना सांगितलं. एवढंच नाही तर अजित पवार रोहित पवार यांना म्हणाले की, रोहित वाचलास, जर मी एक सभा घेतली असती तर काय झालं असतं हे तुला माहिती आहे ना म्हणत अजित पवार यांनी रोहित पवार यांना सुनावलं.
रोहित पवार काय म्हणाले?
कराडच्या प्रितीसंगमावर रोहित पवार-अजित पवार आमने-सामने आले होते. यावेळी दोघांमध्ये खास गप्पा झाल्या. यावेळी रोहित पवार अजित पवार यांच्या पाया देखील पडले. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांना शुभेच्छा देत म्हणाले की, वाचलास रोहित, जर मी एक सभा घेतली असती तर काय झालं असतं तुला माहिती आहे ना असं अजित पवार म्हणाले. त्यावर रोहित पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार काकांच्या अधिकारवाणीनं बोलले आहेत. आमचे वैचारिक मतभेद कायम असल्याचं रोहित पवार यावेळी म्हणाले.
अजित पवारांचा घूमजाव
अजित पवार रोहित पवार यांना जे म्हणाले ते सगळ्या जगानं ऐकलं. परंतु, अजित पवार यांनी त्यावर घूमजाव केला. जामखेडच्या सभेबाबत आपण काहीच बोललो नसल्याचं अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी फुटल्यानंतर रोहित पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांत अबोला होता. दोघं कधीही सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी बोलले नव्हते. उलट एकमेकांवर टीकेची एकही संधी त्यांनी सोडली नव्हती. प्रितीसंगमावर मात्र काका-पुतण्यांच्या नात्यामधील ओलावा स्पष्ट जाणवला.