क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! फक्त 7 धावांवर संपूर्ण संघ All Out; 7 फलंदाज खातंही उघडू शकले नाहीत

सध्या एकीकडे आयपीएल मेगालिलावामुळे (IPL Mega Auction) क्रिकेटप्रेमी उत्साहात असताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात अजब रेकॉर्डची नोंद झाली आहे. एक संघ फक्त 7 धावांवर सर्वबाद झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 25, 2024, 07:20 PM IST
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! फक्त 7 धावांवर संपूर्ण संघ All Out; 7 फलंदाज खातंही उघडू शकले नाहीत title=

Lowest Totals in T20i: टी-20 सामना म्हटलं की, त्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळणार हे नक्की असतं. सध्याच्या वेगवान आयुष्यात अनेकजण टी-20 सामने पाहण्यातच रस घेतात. टी-20 हा गोलंदाजांपेक्षा, फलंदाजांचा जास्त खेळ असल्याचं नेहमी म्हटलं जातं. पण एका टी-20 सामन्यात गोलंदाजांनी कमाल केली असून संपूर्ण संघाला फक्त 7 धावांमध्ये गारद केलं. हे वाचवल्यानंतर तुमच्याही भुवया आश्चर्याने उंचावल्या असतील. पण खऱंच असं झालं आहे. 24 नोव्हेंबरला क्रिकेट चाहते जेद्दा येथील आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाचा आनंद घेत होते, तेव्हा दुसरीकडे टी-20 सामन्यात एक संघ फक्त 7 धावांमध्ये बाद झाला होता. या संघाच्या नावे टी-20 मधील सर्वात कमी धावसंख्येची नोंद झाली आहे. 

आयसीसी टी-20 विश्वचषक उप-प्रादेशिक आफ्रिका पात्रता फेरीतील गट क सामन्यात नायजेरियाविरुद्ध आयव्हरी कोस्ट संघ अवघ्या 7 धावांत गारद झाला. 11 फलंदाज मिळूनही संघासाठी दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. यासोबतच आयव्हरी कोस्टच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही संघाने केलेल्या सर्वात कमी धावसंख्येचा लज्जास्पद विक्रमही नोंदवला गेला. यापूर्वी हा लज्जास्पद विक्रम मंगोलिया आणि आयल ऑफ मॅनच्या नावावर होता. दोन्ही संघांनी समान 10 धावा केल्या होत्या. मंगोलियाचा संघ दोन महिन्यांपूर्वी सिंगापूरविरुद्ध 10 धावांत गारद झाला होता, तर आयल ऑफ मॅनचा संघ गेल्या वर्षी स्पेनविरुद्ध 10 धावांत गारद झाला होता.

प्रथम फलंदाजी करताना नायजेरियाने 4 गडी गमावत 271 धावांची मजल मारली होती. धावांचा पाठलाग करताना आयव्हरी कोस्ट संघ 7.3 षटकात केवळ 7 धावाच करु शकला आणि सर्वबाद झाला. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये एखादा संघ दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे. नायजेरियासाठी सलामीवीर सालेम सालेउ 112 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला, तर सुलेमान रनसेवे (50) आणि इसाक ओकपे (नाबाद 65) यांनी अर्धशतकं झळकावली.

7 फलंदाज खातंही उघडू शकले नाहीत

धावांचा पाठलाग करताना आयव्हरी कोस्टचा संघ फक्त 8 षटकांत सर्वबाद झाला. संघाचे 7 फलंदाज खाते न उघडताच तंबूत परतले. सलामीवीर ओक मोहम्मदने सर्वाधिक चार धावा केल्या. नायजेरियाने हा सामना 264 धावांनी जिंकला, जो या फॉरमॅटमधील तिसरा सर्वात मोठा विजय आहे. सर्वात मोठा विक्रम झिम्बाब्वेच्या नावावर आहे, ज्याने गेल्या महिन्यात गॅम्बियाचा 290 धावांनी पराभव केला होता.