2004 मध्ये आलेल्या त्सुनामीच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. या त्सुनामीत तामिळनाडूच्या कीचनकुप्पम येथे सगळं काही उद्ध्वस्त केलं होतं. त्यावेळी नागापट्टिनम (Nagapattinam) येथे जिल्हाधिकारी असलेल्या डॉक्टर जे राधाकृष्णन ((Dr. J Radhakrishnan) यांना मलब्यात मीना नावाची एक लहान मुलगी सापडली होती. ही मुलगी फार भेदरली होती आणि रडडत होती. मुलीला वाचवल्यानंतर नागापट्टिनम येथील अन्नाई सत्या सरकारी बालगृहात ठेवण्यात आलं होतं. आता 21 वर्षानंतर ही मुलगी मोठी झाली असून, डॉक्टर जे राधाकृष्णन यांनी तिचं लग्न लावून दिलं आहे. ह्रदयाला भिडणारा हा किस्सा त्यांनीच शेअर केला आहे.
26 डिसेंबर 2004 रोजी आलेल्या हिंद महासागरातील विनाशकारी त्सुनामीमुळे तामिळनाडूतील नागापट्टिनम जिल्ह्यात प्रचंड विनाश झाला. 6 हजार लोकांनी यामध्ये प्राण गमावले होते. हे संकट आलेलं असताना नागापट्टिनमचे जिल्हाधिकारी असलेले डॉ. जे. राधाकृष्णन यांना ढिगाऱ्याजवळ एक लहान मुलगी रडताना आढळली. त्या मुलीचे नाव मीना होते, तिला नंतर अन्नाई सत्य सरकारी बालगृहात ठेवण्यात आले. तथापि, डॉ. राधाकृष्णन आणि त्यांच्या पत्नी कृतिका यांनी मीनाची काळजी घेणे सुरू ठेवले आणि तिला कधीही एकटं वाटू दिलं नाही.
मीनाने खूप अभ्यास केला आणि नर्स झाली. तिच्या या प्रवासात डॉक्टर राधाकृष्णन नेहमी तिच्या पाठीशी उभे राहिले. दुसरीकडे बदली झाल्यानंतरही त्यांनी मीनाचं शिक्षण आणि भविष्य याकडे दुर्लक्ष न करता मदत करणं सुरु ठेवलं. जेव्हा मीनाच्या लग्नाची वेळ आली, तेव्हा आपल्या आयुष्यातील या मोक्याच्या आणि नाजूक क्षणी वडिलांसमान असणाऱ्या डॉक्टर राधाकृष्णन यांची आठवण काढली. हे समजल्याने आयएएस अधिकारी स्वत: लग्नात पोहोचले आणि आपणच लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.
डॉक्टर राधाकृष्णन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये मीनाच्या लग्नाचे फोटो आणि बालपणीच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. त्यांनी लिहिलं आहे की, "नागापट्टिनममध्ये एक हृदयस्पर्शी पुनर्मिलन. मीना आणि मणिमारनच्या लग्नाचा भाग असल्याचा आनंद झाला. त्सुनामीनंतर नागापट्टिनमच्या मुलांसोबतचा आमचा प्रवास नेहमीच आशेने भरलेला राहिला आहे. त्यांना वाढताना, अभ्यास करताना, पदवीधर होताना आणि आता सुंदर जीवन घडवताना पाहून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू येतात."
या पोस्टने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. अनेकांनी त्यांच्या माणुसकीला सलाम केला आहे. एका युजरने लिहिलं आहे की, "खूपच प्रेरणादायी सर. तुमचा पाठिंबा आणि समर्पण शब्दात वर्णन करणे कठीण आहे. तुम्हाला सलाम." दरम्यान, दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की, "तुम्ही केवळ प्रशासकीय अधिकारी म्हणून नव्हे तर एक वडील म्हणूनही मुलांची काळजी घेतली. हे अत्यंत कौतुकास्पद आहे."