Chhaava Movie : सध्या सगळीकडे 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'छावा'ची चर्चा सुरु आहे. कलाकार, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, व्हीएफएक्स हे सगळे कमाल आहेच. याव्यतिरिक्त या चित्रपटाला लाभलेली कथा आणि पटकथा लिहिणारी टीमही तितकीच जबरदस्त आहे. ऐतिहासिक चित्रपट असल्याने त्याची मांडणी पडद्यावर योग्यरित्या होणे, हे खूप महत्वाचे असते आणि ही जबाबदारी लक्ष्मण उतेकर, ऋषी वीरमानी, कौस्तुभ सावरकर, उन्मन बनकर आणि ओंकार महाजन यांनी लीलया पेलली आहे. ओंकार महाजनची ही पहिली फिचर फिल्म असल्यानं त्याच्यासाठी हा खास अनुभव होता. त्याचा हा आनंददायी क्षण त्यानं सर्वांसोबत शेअर केला आहे.
ओंकार महाजन याविषयी बोलताना म्हणाला, 'फिचर फिल्म म्हणून हा माझा पहिला चित्रपट आणि पहिलाच चित्रपट इतक्या नामवंतांसोबत करायला मिळणे, यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. यापूर्वी लक्ष्मण सरांसोबत मी असोसिएट म्हणून काम केलं आहे. त्यामुळे या प्रोजेक्टसाठी त्यांनी पहिला फोन मला केला. मग हळूहळू त्यात एकेक जण सहभहगी झाले. ऋषी सरांचे हिंदीवर प्रभुत्व असल्यानं, कौस्तुभनं यापूर्वी 'लोकमान्य'साठी संवाद लिहिले आहेत, त्याचा इतिहासाचा अभ्यास आहे. उन्मननेही कौस्तुभसोबत काही चित्रपट केले आहेत. तर या सगळ्यांना घेऊन आमची एक टीम तयार झाली. कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनपासून आमचे या चित्रपटावर काम सुरु झाले. सुरुवातीच्या काळात आमचे फक्त व्हिडीओ कॉन्फरन्सवर हे सगळं काम सुरु होतं. साधारण दोन अडीच वर्षं आम्ही कथा, पटकथेवर काम केलं आणि अखेर आता आमचा 'छावा' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा : पाकिस्तानी मौलवीला करायचंय राखी सावंतशी लग्न; प्रपोज करण्याआधी घेणार 'या' व्यक्तीची परवानगी
विकी कौशलसारख्या अष्टपैलू अभिनेत्यासोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल ओंकार महाजन म्हणाला, 'विकी आणि आमच्या टीमचं पहिले संभाषण चित्रीकरण सुरु व्हायच्या आधी झालं होतं. विकी पिअर्सिंग करण्यासाठी आला होता आणि आम्ही स्क्रिप्टवर काम करत बसलो होतो. साधारण 20-22 दिवसांनी चित्रीकरण सुरु होणार होतं. आमच्यासाठी त्याला भेटण्याचा अनुभव कमाल होता. आम्ही तसे नवीन आहोत. मात्र, विकी एक प्रसिद्ध अभिनेता आहे. असं असतानाही ज्यापद्धतीनं तो आमच्यासोबत वागत, बोलत होता. त्याला तोड नाही. चित्रीकरणादरम्यानही आम्ही प्रत्येक सेटवर असायचो. सेटवरही तो आमच्यासोबत सौजन्यतेनं वागायचा. त्याच्यात काहीतरी जादू आहे. सेटवरही तो स्वतः येऊन मिठी मारणार, चौकशी करणार. तो एक अभ्यासू आणि गुणी अभिनेता आहे. त्याचे मराठीबाबत काही प्रश्नही असायचे. बऱ्याचदा आमच्यात याबद्दल चर्चाही व्हायची. त्यामुळे विकी कौशलसोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता.