Aditi Tatkare on Laadki Bahin Yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा 5 लाख इतका झाला आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे. तसंच पात्र लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही आदिती तटकरे यांनी दिली आहे.
आदिती तटकरे यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतून वगळण्यात येत आहे".
"अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या 2 लाख 30 हजार महिला आहेत. वय वर्षे 65 पेक्षा जास्त असलेल्या महिलांचा आकडा 1 लाख 10 हजार आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1 लाख 60 हजार आहेत. यासह एकूण अपात्र महिलांची संख्या 5 लाख होत आहे," अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना !
दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतून वगळण्यात येत आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :
संजय…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) February 7, 2025
हिंगोलीत लाडक्या बहिणीच्या पडद्याआड पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. कारवाईच्या भीतीनं 4 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेतून माघार घेतली आहे. माघार घेतलेल्या 8 लाभार्थींपैकी 4 पुरुष आहेत. आधारकार्डवर महिलांचा फोटो लावून योजनेचा त्यांनी लाभ घेतला होता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चार लाडक्या भावांनी घेतल्याचा प्रकार हिंगोली जिल्ह्यात उघडकीस आला. विशेष म्हणजे आत्तापर्यत त्या चौघांनी प्रत्येकी 9 हजार रुपये उचलले आहेत. या योजनेंतर्गत केवळ महिलांना लाभ दिला जातो. परंतु औंढा नागनाथ तालुक्यातील चौघांनी आधार कार्डवर महिलांचे फोटो लावून बनावट आधारकार्ड तयार करून या योजनेचा लाभ घेतला. आत्तापर्यंत चौघा जणांनी सहा हप्त्याचे प्रत्येकी 9 हजार रुपये अनुदान ही उचलले असून शासनाने ज्या कुणाला योजनेचा लाभ घ्यायचा नसेल त्यांनी तसा अर्ज करावा असे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातून आठ अर्ज प्राप्त झाले असून चार महिला आणि चार पुरुषांचे अर्ज हे अर्ज आहेत. या योजनेतंर्गत लाटलेले प्रत्येकी 9 हजार रुपये त्या चौघांकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी राजकुमार मगर यांनी दिली.