Baramati Lok Sabha Election 2024 : बारामतीत यंदा पवार विरुद्ध पवार असा सामना पहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) मैदानात उतरल्या असताना अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी दिली आहे. सुनेत्रा पवार यांच्यासाठी आता अजित पवारांनी (Ajit Pawar) चांगलीच फिल्डिंग लावायला सुरूवात केली आहे. अशातच आता बारामतीत दौऱ्यावर (Baramati News) असलेल्या अजित पवारांनी शहरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला अन् काकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी अजित पवारांनी शिवतारेंचा (Vijay Shivtare) उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
बारामती ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. महायुती उमेदवार म्हणून सुनेत्रा अजितराव पवार हे नाव पुढं आलंय, ज्यांना घड्याळाच्या चिन्हाच्या समोरील बटन दाबून विजयी करायचं आहे, असं आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांना केलं आहे. त्यावेळी अजित पवारांनी शिवतारेंचा उल्लेख करत एक मोठं वक्तव्य केलं. विजय शिवतारेंनी मला फोन कॉल दाखवले. माघार न घेण्यास त्यांना फोन आले होते, असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
बारामतीकरांनी 1991 ला मला निवडून दिलं, त्यानंतर वडिलांना निवडून दिलं, म्हणजे साहेबांना निवडून दिलं, आता लेकीला निवडून दिलंय आता सुनेला म्हणजेच सुनेत्राला निवडून द्या. म्हणजे मुलगा खूश.. वडील आणि लेक खूश.. आणि सूनही खुश.., असं अजित पवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम चांगलं असून पुलवामा असेल किंवा देशाच्या सीमेची सुरक्षितता अत्यंत व्यवस्थित ठेवण्याचं काम त्यांनी केलं, असं म्हणत अजित पवार यांनी मोदींचं कौतूक केलं आहे.
आताच्या खासदार यांनी आपल्या पुस्तकात सर्व कामे मीच केले असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, बारामती नमो रोजगार मेळावा घेतला यामध्ये दहा हजार युवकांना नोकऱ्या मिळाल्या, असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. तर बारामतीत फॉर्म भरल्यानंतर फक्त शेवटची सभा व्हायची आता किती फिरावे लागत आहे, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना टोला लगावला. बारामतीतील अनेक जण म्हणतात आता या काळात त्यांना कसं सोडायचं? काय करायचं अरे पण विकास करायचा असेल तर असे म्हणून चालणार नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.
बारामती गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत. त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय अजिबात भावनिक होऊ नका. गावातील लोकांनी गावाचंच पहावं बाहेरच्या गावात जाऊ नये, असंही अजित पवार म्हणाले. अजून देखील मी तोंड उघडले नाही मी तोंड उघडले तर यांना फिरता येणार नाही. फार वळवळ करताय काय? आम्ही कुणाला दमच दिला नाही पाणी देणार नाही हे नाही असे मी म्हणालोच नाही. मी कधी कुणाला दम दिला नाही फार तर आठवण करून दिली असेल. मला अनेक जण म्हणतात पक्ष चोरला. पक्षाची जबाबदारी घेतली म्हणून काय पक्ष चोरला असा अर्थ होत नाही, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
आज 80 टक्के आमदार माझ्याबरोबर आहेत त्यांना मी पैसे दिले म्हणून ते माझ्या बरोबर आहेत का? आम्ही भूमिका घेतली म्हणून ती पटली म्हणून तर ते बरोबर आहेत ना? पार्लमेंट मध्ये फक्त भाषणे देऊन बारामतीचे प्रश्न सुटत नाहीत. मी भाषणे करतो आणि कामं करतो. विकासाला निधी आणतो, असंही अजितदादा म्हणाले. आपण आपली विचारधारा सोडलेली नाही आपण भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत कुठला मायकालाल सविधान बदलू शकत नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.