Maharashtra Political : काँग्रेस (Congress) नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चेमुळे एकच खळबळ उडाली. लातूरच्या गढीवर लवकरच भाजपचं कमळ फुलू शकतं अशी एकच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. भाजपचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil nilangekar) यांनी याबातचे वक्तव्य केले होते. लातूरचे प्रिन्सदेखील भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचं निलंगेकरांनी म्हणाले राज्याचे राजकारण ढवळून निघाले. भाजप प्रवेशाच्या चर्चेवर अखेर अमित देशमुख यांनी या वक्तव्यावर आपली जाहीर प्रतिक्रिया दिली आहे.
अनेक महिन्यांपासून ठराविक काळानंतर एक चर्चा सातत्यानं सुरु आहे, ती म्हणजे काँग्रेसचे आमदार भाजपत जाणार. यात अनेक नाव जोडली गेली होती. पण आता माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अमित देशमुखच भाजपच्या वाटेवर असल्याची जोरात चर्चा रंगलीय. अशी चर्चा सुरु होण्यामागे कारण ठरलंय ते भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचं विधान.. अमित देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याचं वक्तव्य संभाजी पाटील निलंगेकरांनी केले.
अमित देशमुख भाजपत का जाऊ शकतात याचंही विश्लेषण सुरु झाले आहे. एमआयडीसी जमीन आणि कर्जप्रकरणात अमित देशमुखांवर आरोप झालेत. रितेश आणि जेनेलिया यांना नियमबाह्य पद्धतीने उद्योगासाठी जमीन दिल्याचा आरोप आहे. जमीन खरेदीसाठी सहकाही बँकेने नियमबाह्य पद्धतीने कर्ज दिल्याचा आरोप ही त्यांच्यावर आहे. जमीन व्यवहार प्रकरणात देशमुख कुटुंबाची चौकशी करण्यात येणार आहे. विलासरावांचा वारसा असला तरी अमित देशमुख राजकारणाच्या मुख्य प्रवाहात दिसत नाहीत. भाजपत प्रवेश केला तर लातूरचं नाव मुख्य प्रवाहात येऊ शकतं. मविआ काळात देशमुखांचा वारसा असतानाही दुय्यम दर्जाचं मंत्रीपद मिळालं होतं. त्यामुळे देशमुख काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे.
अमित देशमुख पक्ष सोडणार नाहीत, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. लातूरसह मराठवाड्याच्या राजकारणात विलासराव देशमुखांचं वर्चस्व राहिलंय. मराठवाड्यात देशमुख कुटुंबाला मानणारा वर्ग आहे. अमित देशमुखांच्या एंट्रीनं मराठवाड्यात भाजपचं पारडं जड होईल अशी चर्चा आहे.
कितीही वादळं आली आणि कितीही संकटं आली तरी लातूरचा देशमुख वाडा आहे तिथेच राहणार अशी प्रतिक्रिया, काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांनी दिलीय. ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्या पार्श्वभूमीवर सांगलीत विटामधील कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं. भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला तूर्तास देशमुख यांनी पूर्णविराम दिला आहे.