Nirmala Sitharaman Education Qualification: अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज (1 फेब्रुवारी 2025) रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्मला यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प असणार आहे. अर्थमंत्री निर्मला आज अर्थसंकल्प सादर करण्यासाठी उभ्या राहतील तेव्हा त्यांच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला जाईल. आज निर्मला सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमाच्या एक पाऊल जवळ पोहचतील. भारताच्या एका माजी पंतप्रधानांच्या नावावर एकूण 10 अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे. निर्मला यांचं शिक्षण किती, या बजेटकडून काय अपेक्षा आहे सर्वाधिक वेळा बजेट सादर करण्याचा विक्रम यासारख्या गोष्टींबद्दल जाणून घेऊयात...
आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये सीतारमण या मंदावलेल्या अर्थिक विकासाला चालना देण्यासाठी काही घोषणा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच महागाई आणि स्थिर वेतनवाढीच्या माध्यमातूनही मध्यमवर्गियांना दिलासा देण्याचा अर्थमंत्र्यांचा प्रयत्न असेल असं सांगितलं जात आहे. तसेच बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवरही उपाययोजना म्हणून विशेष तरतुदी केल्या जातील असं सांगण्यात येत आहे.
माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अर्थमंत्री म्हणून 1959 ते 1964 पर्यंत एकूण सहा अर्थसंकल्प सादर केले होते. यानंतर 1967 पाहून 1969 दरम्यान त्यांनी चार अर्थसंकल्प सादर केले. सीतारमण आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार असून त्या या विक्रमाच्या जवळ पोहोचतील. सीतारमण 2019 मध्ये पहिल्यांदा भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री झाल्या. याचवर्षी पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी सात वेळा बजेट सादर केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्रालयाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
निर्मला यांनी 1 फेब्रुवारी 2020 ला 2 तास 40 मिनिट अर्थसंकल्पीय भाषण करत विक्रम नोंदवला होता. हे सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण ठरलं. यापूर्वी 1977 साली हीरुभाई मुलजीभाई पटेल यांनी देशाचं सर्वात कमी शब्दांमध्ये अर्थसंकल्प मांडला होता. त्यांचं भाषण केवळ 800 शब्दांचं होतं.
सीतारमण यांनी अर्थशास्रामध्ये एम. ए. पर्यंत शिक्षण घेतलं असून त्यांनी एफीलची पदवीही घेतली आहे. निर्मला यांचं शिक्षण तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथील सांथलक्ष्मी रामस्वामी कॉलेजमध्ये झालं असून त्यांनी उच्च शिक्षण जवाहरलाल नेहरु विद्यापिठातून केलं आहे.