Stray Dog Attack : सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या लहान मुलावर भटक्या कुत्र्यानं जीवघेणा हल्ला चढवला, अमरावतीतील (Amaravati) थरकाप उडवणारं हे दृश्य सीसीटीव्हीत (CCTV) कैद झालं आहे. कृष्णा सागर मलिये असं या सात वर्षांच्या मुलाचं नाव आहे. त्याला आडवं पाडून कुत्र्यानं पोटाला, पायाला आणि गळ्याला चावे घेतले. त्याच्या दुर्दैवानं आसपास कुणीही नसल्यानं कुत्र्याच्या तावडीतून त्याला सोडवता आलं नाही. या हल्ल्यात कृष्णा गंभीर जखमी झाला आहे.
दौंडमध्ये 20 ते 22 जणांना चावा
रात्री अपरात्री निर्जन रस्त्यावरून चालणाऱ्यांना किंवा दुचाकी चालकांना कुत्रे चावल्याच्या घटना दररोज कुठं ना कुठं घडतच असतात. पण दौंडच्या एसआरपी कॅम्पमधील म्हसोबा यात्रेत तब्बल 20 ते 22 जणांना पिसाळलेला कुत्रा चावल्याची धक्कादायक घटना घडलीय.. या जखमींवर उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे.
कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीजचा धोका
भटक्या कुत्र्यांचा हा वाढता उपद्रव रोखण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. कुत्र्यांच्या चाव्यामुळं रेबीज हा प्राणघातक आजार होऊ शकतो. त्यामुळं भटक्या कुत्र्यांचं लसीकरण होणं गरजेचं आहे. त्याचवेळी ज्या भागात भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त आहे, तिथल्या नागरिकांनीही रेबिज प्रतिबंधक लस घेणं आवश्यक आहे.
भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ
राज्यात बहुतांश ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी कुत्रा चावल्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. दिवसाला कुत्रा चावल्याच्या दहा ते बारा घटना समोर येत आहेत. कुत्रा चावल्यानंतर रेबीज लस घेणे अनिवार्य आहे. नाहीतर आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार रेबीजने मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत भारताचा जगात द्वितीय क्रमांक आहे.
हे ही वाचा : त्या किंचाळत होत्या, ओरडत होत्या... भूल न देताच 24 महिलांवर झाली नसबंदी शस्त्रक्रिया
अशी घ्यावी काळजी -
- कुत्रा चावल्यावर जखम त्वरित स्वच्छ पाण्याने धुवावी. जखमेवर गरम पाण्याची धार सोडावी.
- जखमेवर स्पिरीट, टीचर, आयोडीनसारखे जंतूनाशक लावावे. जखमेवर पट्टी बांधू नये.
- कुत्रा चावल्यानंतर उपचारासाठी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.