इंदापुरात पार पडलं तुकोबांच्या पालखीचं दुसरं रिंगण!

मुख्य पालखीतल्या टाळकरी वारकऱ्यांनी भजन करत फुगडी आणि झिम्मा खेळत, शेवटी उडी घेऊन या रिंगण सोहळ्याची सांगता केली

Updated: Jul 5, 2019, 07:54 PM IST
इंदापुरात पार पडलं तुकोबांच्या पालखीचं दुसरं रिंगण! title=

जावेद मुलाणी, झी २४ तास, इंदापूर, पुणे : श्रीक्षेत्र देहूहून निघालेल्या तुकोबांच्या पालखीचं मानाचं दुसरं रिंगण, हरीचं नाम घेत, आनंदाच्या डोहात डुंबत, पावसाच्या सरी अंगावर झेलत, पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर शहरात संपन्न झालं. 

तुकोबांची पालखी दुपारी बारा वाजता रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय प्रांगणात दाखल झाली. तिथे नगारखाना प्रदक्षिणा झाल्यानंतर अश्वाची पाहणी झाली आणि पाठोपाठ भगवे पथकाचे झेंडेकरी विणेकरी धावले. त्या मागोमाग हंडेकरी, तुळशीवाल्या भगिनी, पखवाज वादकही धावले. 

सुरुवातीला मानाच्या अश्वानं आणि नंतर अकलूजच्या मोहिते पाटील यांच्या अश्वांनी प्रदक्षिणा पूर्ण केली. दोन्ही अश्वांच्या परिक्रमेनं लाखो डोळ्यांचं पारणं फेडलं... आणि अश्‍वांच्या टापांची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी रिंगणात एकच गर्दी केली. 

त्यानंतर मुख्य पालखीतल्या टाळकरी वारकऱ्यांनी भजन करत फुगडी आणि झिम्मा खेळत, शेवटी उडी घेऊन या रिंगण सोहळ्याची सांगता केली. 

रिंगण आटोपल्यानंतर पालखी सोहळा शहरातल्या नारायणदास रामदास हायस्कूल प्रांगणात उभारण्यात आलेल्या भव्य शामियान्यात मुक्कामी विसावला.