जयेश जगड, झी मीडिया, अकोला : अकोला पूर्व मतदारसंघातून काँग्रेसच्या एका नाराज इच्छुक नेत्यानं पक्षश्रेष्ठींवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. अजाबराव ताले असं या बंडखोर काँग्रेस नेत्याचं नाव आहे. राज्यातील काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं आपल्याला तिकिटासाठी २० लाख मागितल्याचा आरोप ताले यांनी केलाय. अकोला पूर्व मतदारसंघातून तिकिटासाठी या नेत्यानं पैशांची ही मागणी केल्याचंही ताले यांनी म्हटलंय.
विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटप करण्यासाठी काँग्रेसनं दलाल नेमल्याचाही आरोप यावेळी ताले यांनी केला. अकोल्यातील काँग्रेसमध्ये एक दलालही सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केलाय. गेल्या २१ वर्षांपासून अजाबराव ताले हे अकोल्यात काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत. ते आजवर पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम सांभाळत होते.
अकोला पूर्व मतदारसंघातून काँग्रेसनं विवेक पारसकर या उद्योजकाला तिकीट देऊन आपला अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलंय. मात्र निवडणुकीच्या तोंडावर पारसकर यांनी पक्षात प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली, असं म्हणत तालेंनी यामागची देवाण-घेवाण सूचित केली.
दरम्यान, अजाबराव ताले यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठविलाय तर उमेदवारीसाठी देण्यात आलेल्या मुलाखतीच्या वेळी दिलेली १५ हजाराची रक्कमही आपल्याला परत मिळावी, अशी मागणी त्यांनी पक्षाकडे केलीय. उद्या अर्थात शुक्रवारी ताले अकोला पूर्वमधून अपक्ष म्हणून आपली उमेदवारी दाखल करणार आहेत.