शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर जिल्ह्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. औसा येथे मुख्यमंत्र्यांचे स्विय सहायक अभिमन्यू पवार यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर त्यांना चक्रव्युव्हात अडकविण्याचे काम भाजपमधील बंडखोर मंडळी करीत आहेत. ज्यात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद निलंगेकर हे भाजपमधील दोन तर शिवसेनेच्या एका बंडखोरात सामील झाले आहेत. दरम्यान उदगीरमधील सलग दोन वेळेसचे आमदार सुधाकर भालेराव यांनाही तिकिट न मिळाल्यामुळे त्यांनीही बंडाचा झेंडा फडकवित अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले आहेत.
लातूर जिल्ह्यातील औसा, लातूर ग्रामीण, उदगीर आणि अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये मोठी बंडाळी माजली आहे. कुणी तिकीट न मिळाल्यामुळे तर कुणी मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यामुळे बंडखोरी केली आहे. औसा विधानसभा मतदारसंघ तसा शिवसेनेचा मानला जातो. मुख्यमंत्र्यांचे स्विय सहायक असलेल्या अभिमन्यु पवार यांना हा मतदारसंघ मिळावा म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.
मात्र अभिमन्यू पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे धाकटे बंधू अरविंद पाटील त्यांच्या समर्थकांसह रस्त्यावर उतरले. तसेच अरविंद निलंगेकर यांनी बंधू पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची गाडी अडवुन भूमीपुत्राचा विषय घेऊन अभिमन्यू यांचे तिकीट रद्द करण्याची गळ घातली.
फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेचे सभापती बजरंग जाधव, औसा भाजपचे नेते किरण उटगे आणि शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्जही भरले. अरविंद पाटील निलंगेकर यांच्या प्रत्यक्ष सहभागाने घडत होता. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शिवसेनेच्या बंडखोर दिनकर माने यांनी सर्व बंडखोरापैकी एकच अर्ज राहणार असल्याचे जाहीर केलं. तर भाजपमधील बंडखोरीचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नसल्याचे अभिमन्यू पवार यांनी स्पष्ट केले आहे.
उदगीर या राखीव विधानसभेतुन सलग दोन वेळेस भाजपच्या तिकिटावर आमदार झालेले तसेच विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांचेही तिकीट पक्षाने कापले. परिणामी भाजपला काही जणांनी दलालांचा पक्ष केल्याचा आरोप करीत पोटराजाच्या वेशभूषेत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. तर लातूर ग्रामीण मधून सलग दोन वेळेस भाजपचे तिकीट घेऊन तिकीट देऊनही रमेशप्पा कराड हे निवडून न आल्यामूळे तिसऱ्यांदा नशीब आजमविणार होते. मात्र पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक असूनही ही जागा ऐनवेळी शिवसेनेला सोडण्यात आली. कसलीही पूर्वसूचना न देता केलेला हा प्रकार 'अर्थ'पूर्ण राजकारणातून झाल्याचा आरोप रमेशप्पा कराड यांनी केला. त्यामुळे ते ही आता अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहेत.
याशिवाय अहमदपूर विधानसभेत भाजपचे अहमदपूर येथील नेते दिलीप देशमुख, भाजपच्या पंचायत समिती सभापती अयोध्या केंद्रे यांनीही बंडखोरी केली आहे.आता देशमुख हे अपक्ष तर केंद्रे या वंचित कडून उभे राहणार आहेत. नेहमीच विविध पॅटर्नमुळे चर्चित असणाऱ्या लातूरने जिल्ह्याच्या राजकारणातील इतक्या मोठ्या प्रमाणातील बंडखोरीचा ही एक पॅटर्नच बनविला की काय अशी शंका मतदारांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात बंडोबा थंड होतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.