एमआयएमला वंचितचे दरवाजे उघडे, चर्चेला यावे - आंबेडकर

 वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची तुटलेली युती पुन्हा एकदा एकत्र येण्याची दाट शक्यता आहे.

Updated: Oct 7, 2019, 04:29 PM IST
एमआयएमला वंचितचे दरवाजे उघडे, चर्चेला यावे - आंबेडकर  title=

शशिकांत पाटील, झी मिडीया, लातूर : वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची तुटलेली युती पुन्हा एकदा एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. एमआयएमसाठी सर्व दरवाजे खुले असून ज्यांनी दरवाजे बंद केले होते त्यांनीच ते खोलावेत असेही वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय. ते लातूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आमच्या समितीशी संपर्क साधून चर्चा करावी त्यातून नक्कीच योग्य मार्ग निघेल असा विश्वासही आंबेडकर यांनी व्यक्त केला. 

मात्र लोकसभेत वंचित आघाडीला मिळालेली मते ही नॉन मुस्लिम होती असा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान वंचित आघाडी ही राज्यातील ०१ कोटी ४० लाख मतदारांपर्यंत पोहोचली असून आणखी २० ते २५ लाख मतदारांपर्यंत पुढील १०-१२ दिवसात पोहचून राज्याची पुढील सत्ता मिळवू असा दावाही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

एमआयएमच्या वाट्याला २८८ पैकी फक्त ८ जागा देण्यावर वंचित आघाडी ठाम असल्याने आमची युती तुटल्याचे इम्तियाज यांनी म्हटले होते. ओवेसी यांनी युती तोडण्याची घोषणा करण्याचं आपणास सांगितल्याचे ते म्हणाले होते. औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी युती तोडण्याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी घेतला असल्याचं एका कार्यक्रमात जाहीर केले होते. 

आमची युती ही  महाराष्ट्रातील नेत्यांसोबत झाली नसून ओवेसी यांच्यासोबत झाल्याचा टोला त्यांनी इम्तियाज यांना लगावला होता. शेवटच्या दिवसापर्यंत आमची युती होऊ शकते असेही आंबेडकर म्हणाले. या पार्श्वभुमीवर वंचितने २५ मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे वंचित सोबत एमआयएमची आघाडी होणार का ? हा प्रश्न इतके दिवस गुलदस्त्यातच होता.