मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघा एक आठवडा राजकीय पक्षांच्या हाती आहे. त्यामुळे आज आणि उद्या प्रचाराचा धडाका उडवून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आज राज्यभरात तब्बल सात प्रचारसभा घेत आहेत. मुख्यमंत्री विदर्भ पिंजून काढत आहेत. तर उद्धव ठाकरेही नाशिक जिल्ह्यात दोन आणि धुळ्यात एक प्रचारसभा घेत आहेत. भुजबळांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची होणारी सभा विशेष आहे. शरद पवारही मराठवाड्यात आहेत. मराठवाड्यात बीड आणि उदगीर इथे पवारांच्या सभा होत आहेत तर भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जगतप्रकाश नड्डाही जालना आणि औरंगाबादमध्ये प्रचारसभा घेत आहेत.
विकेंडला मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस होमग्राऊंडमध्ये आहेत. विदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या तब्बल ७ सभापैंकी ३ सभा नागपुरात होणार आहेत.
सकाळी १०.४५ वा : वाशीम (वाशीम)
सकाळी १२.४५ वा : अकोट (अकोला)
दुपारी ०२.०० वा : दर्यापूर (अमरावती)
दुपारी ०३.४५ वा : कारंजा घाडगे (वर्धा)
सायं ०६.०० वा : दाभा (पश्चिम नागपूर)
सायं ०७.०० वा : टिंबर मार्केट (दक्षिण-पश्चिम नागपूर)
रात्री ०८.१५ वा : उदयनगर चौक (दक्षिण नागपूर)
तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आज भुजबळांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार आहे. येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे येवल्यात येणार आहेत. नाशिक जल्ह्यात त्यांच्या दोन तर धुळ्यात एक प्रचारसभा होणार आहे. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी वचननामा प्रसिद्ध करण्यापूर्वीच अनेक आश्वासनांची खैरात केली होती. शिवसेना सत्तेवर आल्यानंतर काय करणार हे त्यावेळी सांगितल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठीचा वचननामा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर प्रकाशित करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर आहेत. पवार यांच्या मराठवाड्यात दोन प्रचारसभा होणार आहेत. दुपारी २ वाजता पवारांची उदगीर इथे प्रचारसभा होईल तर दुसरी सभा बीडमध्ये होणार आहे.
निलंगा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देवणी इथं आज सभा होणार आहे. या सभेत ते काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.