औरंगाबाद : रस्त्यावर अडवून 'जय श्रीराम म्हणा नाहीतर मारहाण केली जाईल' अशी धमकी देण्याचा प्रकार औरंगाबाद मध्ये घडला. झोमॅटोमध्ये काम करणाऱ्या दोन तरुणांना ही धमकी देण्यात आली. पोलिसांनी यांची तक्रार नोंदवून घेतली दंगलग्रस्त परिस्थिती तयार करण्याचा गुन्हा दाखल करुन घेतला. तसेच संबंधितांवर तात्काळ कारवाई करणार असल्याचे सांगितले. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असून हजारोंच्या संख्येने गर्दी गोळा झाली होती.
औरंगाबादच्या आझाद चौकात रविवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान हा प्रकार घडला. कारमध्ये बसलेल्या चार ते पाच जणांनी दुचाकीवर जाणाऱ्या दोन युवकांना थांबविले. त्या युवकांना जय श्रीराम म्हणायला सांगितले. जय श्रीराम नाही म्हटल्यास मारहाण केली जाईल अशी धमकी त्यांनी दिली. अखेर त्या युवकांनी जय श्रीराम म्हटलं आणि नंतर त्यांना जाऊ देण्यात आले. हे दोन्ही युवक झोमॅटो मध्ये काम करतात आणि आझाद चौकात ते हॉटेल ऑर्डर घ्यायला आले होते.
या सगळ्या प्रकारानंतर आझाद चौकात मोठी गर्दी जमली होती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणात गुन्हा दाखल केला आणि त्यानंतरच गर्दी कमी झाली. एकाच आठवड्यातील हा दुसरा प्रकार औरंगाबाद घडला आहे. नागरिकांनी शांतता ठेवावी. पोलीस कारवाई करत आहे असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.