औरंगाबाद : खेळताना लहान मुलांनी फळांच्या बिया, पिना, टिकल्या, नाणे गिळल्याचे नेहमीच ऐकण्यात असते. पण औरंगाबादमध्ये एका ३३ वर्षीय व्यक्तीनं लांबलचक टूथब्रशच गिळला. आपल्याकडून चूक झाल्याचं कळताच या इसमाकडून आरडाओरडा आणि धावपळ सुरु झाली. पण असा प्रकार क्वचित घडत असल्यानं डॉक्टर देखील हैराण झाले.
पोटात वेदना सुरू झाल्याने त्याने घाटीत धाव घेतली. तपासणीत पोटात चक्क टूथब्रश पाहून डॉक्टरही चकीत झाले. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी हा ब्रश काढला आणि रुग्णाला वेदनामुक्त केले.
रविवार बाजार परिसरातील हा रुग्ण आहे. २६ डिसेंबर रोजी सकाळी दात घासताना त्याने टूथब्रशच गिळला. पोट दुखू लागल्याने सदर रुग्ण सकाळी ११ वाजता घाटीत दाखल झाला. रुग्णाची अवस्था पाहून तत्काळ उपचार सुरु झाले.उपचारासाठी रुग्णाचा सिटी स्कॅन काढण्यात आला.
तेव्हा रुग्णाच्या पोटात टूथब्रश दिसला. हा प्रकार पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. रुग्णानं हा ब्रश कसा गिळला असेल, असा प्रश्न त्यांनाही पडला. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून हा दूशब्रश पोटातून काढला.