विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : पोलिसांची दादागिरी काही नवीन नाही, अनेकांनी याचा सोस सोसला आहे, असाच एक प्रकार १३ वर्षांपूर्वी औरंगाबादेत घडला. पीडिताला उशीरानं न्याय मिळाला मात्र तो ही तोकडा... औरंगाबादच्या वडोद बजारचे गणी रमझान पठाण गेल्या तेरा वर्षांपासून न्यायासाठी पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि अगदी राजभवनचे उंबरठे झिजवतायत. २००५ साली त्यांच्याच गावातल्या एका हॉटेलमध्ये ते काम करत होते. त्यावेळी हप्ता का देत नाही? म्हणत तिथल्याच एका पोलीस निरीक्षकाने गणी यांना मारहाण केली होती. यांत गणी यांचा कान निकामी झाला... कोणतीही चूक नसताना पोलिसांची ही गुंडगिरी गणी यांना पटली नाही. याबाबत त्यांनी हॉटेल मालकाला माहिती दिली... तिथून सुरु झाला गणी आणि त्यांच्या मालकाचा न्यायासाठी खडतर प्रवास... विविध ठिकाणी उंबरठे झिजवूनही न्याय मिळाला नसल्याने गणी यांनी मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली.
मानवाधिकार आयोगाने २०१७ साली गणी यांना दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना दिले. त्यानुसार गणी यांना भरपाई देण्यात आली. मात्र, १३ वर्षांनंतर पैसे मिळाले तरी दोषींवर कारवाई का नाही? असा सवाल विचारलाय.
खरं तर उशीरानं मिळालेला न्यायसुद्धा अन्यायच असतो, असं म्हणतात. मात्र, या सगळ्यात पोलिसांची दादागिरी आणि उशिराने मिळणारा न्याय या दोन्ही गोष्टी अधोरेखीत झाल्यात.