Baba Siddiqui Murder Case: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून सातत्याने चौकशी करत आहे. मुख्य आरोपी शिव कुमार गौतम यानेही अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. शिव कुमार गौतम याने चौकशीत अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर हल्लेखोर लीलावती रुग्णालयातदेखील गेला होता.
गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत आता शिवकुमार गौतम यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्यानंतर त्यांचा मृत्यू झालाय की नाही हे पाहण्यासाठी आरोपी लीलावती रुग्णालयात गेला होता. सिद्दीकी यांच्यावर हल्ला केल्यानंतर शूटर जवळपास अर्धा तास रुग्णालयात थांबला होता. बाबा सिद्दीकी यांच्या प्रकृतीचे सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी आरोपी तिथेच थांबले होते. जवळपास 30 मिनिटे तिथे थांबल्यानंतर त्याला लक्षात आले की बाबा सिद्दीकी यांचे प्रकृती खूपच नाजूक आहे हे पाहिल्यावरच तो तिथून निघून गेला.
चौकशीत हे देखील समजले आहे की, हल्लेखोर शिवकुमार गौतम याने प्लानिंगनुसारच हल्ला केला. हल्लेखोरांच्या प्लानिंगनुसार, दुसरे आरोपी धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंह हे उज्जैन रेल्वे स्थानकावर भेटणार होते. जिथे बिश्नोई गँगचा एक सदस्य त्यांना वैष्णो देवीला घेऊन जाणार होता. मात्र त्यांचा हा प्लान फसला होता कारण घटनास्थळावरुनच दोन हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारमध्ये माजी मंत्री आणि एनसीपीचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी मुंबईकील वांद्रे येथे गोळी मारुन हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. हल्लेखोर शिवकुमार हत्येच्या घटनेनंतर बहराइच येथे पळून गेला होता. तेथून तो नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. एसटीएफ उत्तर प्रदेश व मुंबई क्राइम ब्रँचच्या संयुक्त कारवाईत त्याला बहराईच येथून अटक करण्यात आले.