'तुम्ही स्वतःबद्दलच संशय निर्माण करून...'; अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी उच्च न्यायालयाने CIDला खडसावलं

Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावर उच्च न्यायालयाने सीआयडीवर ताशेरे ओढळे आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 3, 2024, 09:15 AM IST
'तुम्ही स्वतःबद्दलच संशय निर्माण करून...'; अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी उच्च न्यायालयाने CIDला खडसावलं title=
Badlapur Sexual Assault Case HC Raps CID For Taking Lightly Probe Into Killing Of Accused

Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case: बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंच्या पोलिस कोठडी मृत्यूप्रकरणाचा तपास गांभीर्याने न केल्याबद्दल न्यायालायाने केंद्रीय तपास यंत्रणांवर (CID) ताशेरे ओढले आहेत. सीआयडीचे वर्तन संशयास्पद असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायालयाच्या या निरीक्षणानंतर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे. 

न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी पार पाडली. तेव्हा न्यायालयाने सीआडीला खडे बोल सुनावले आहेत. सध्याच्या तपासात सीआयडीच्या वर्तनामुळं संशय निर्माण होतो, अशी टिप्पणी केली आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांना सीआडी संपूर्ण माहिती देऊ इच्छित नाही, असा चुकीचा निष्कर्ष काढला जाई, असं मत न्यायालयाने नोंदवलं आहे. 

या प्रकरणाचा तपास सीआयडी सहज कसे घेऊ शकते? हे प्रकरण कोठडी मृत्यूशी संबंधित आहे. तुमच्याकडून काय अपेक्षा केली होती आणि आता काय अपेक्षा करणार? तुमच्या वर्तनामुळे तुम्ही स्वतःबद्दलच संशय निर्माण करून घेत आहात. काय तपास करत आहात?" असा संताप न्यायालयाने व्यक्त केला. तसंच, तपासातील त्रुटी आणि न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे सादर केलेली कागदपत्र पाहून खंडपीठाने संताप व्यक्त केला आहे. सीआयडी सक्षम असल्यामुळं स्थानिक पोलिसांकडून सीआयडीकडे तपास वर्ग केला जातो, असा टोलादेखील न्यायालयाने लगावला होता. 

सीआयडी योग्य प्रकारे माहिती का गोळा करत नाही? आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका. वैद्यकीय कागदपत्रे गोळी केली जात नाही. तुम्ही जाणूनबुजून दंडाधिकायांना माहिती देत नाही, असा निष्कर्ष आम्ही काढत आहोत, असे न्यायालयाने खडसावले. तपास नीट करा आणि सर्व साक्षीदारांचे जबाब न्यायदंडाधिकाऱ्याापुढे सादर करा. ते सादर केले तरच दंडाधिकारी योग्य अहवाल देऊ शकतील, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

काय आहे प्रकरण?

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. तसंच, त्याला फाशी देण्यात यावी, यासाठी बदलापूरकरांनी आंदोलन केलं होतं. पोलिस ट्रान्झिस्ट रिमांडसाठी तळोजा जेलमध्ये नेत असताना अक्षय शिंदेंने पोलीस कर्मचाऱ्याची बंदूक खेचण्याचा प्रयत्न केला आणि तीन गोळ्या झाडल्या. या झटापटीत पोलीस अधिकारी निलेश मोरे यांना गोळी लागली आणि ते जखमी झाले. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षण करताना त्याच्यावर गोळी झाडली ज्यामध्ये अक्षय शिंदे जखमी झाला होता. त्याला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं होतं जिथे त्याचा मृत्यू झाला.  

अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर राज्यात  हा ठरवून केलेला एन्काऊंटर होता का? अशी टिका विरोधकांनी केली होती. त्यानंतर हे प्रकरण कोर्टातदेखील गेले आहे.