Bandra Stampede: पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकात रविवारी सकाळच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या दुर्घटनेत 9 प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमी प्रवशांपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर येत आहे. वांद्रे स्थानकात घडलेल्या या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने यासंदर्भात एक पोस्ट करत प्रवाशांना माहिती दिली आहे.
रविवारी सकाळी सहाच्या सुमारास वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवली होती. अंत्योदय एक्स्प्रेस पकडताना ही चेंगराचेंगरी झाली होती. तसंच, रेल्वेकडून सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त विशेष गाडीला उशीर झाला त्यामुळं ती गाडी रद्द करण्यात आली होती. त्यामुळं पाठीमागून येणाऱ्या वांद्रे ते गोरखपूरपर्यंत धावणारी अंत्योदय एक्स्प्रेस सुटणार होती. या ट्रेनसाठी बुकिंग किंवा रिझर्व्हेशन लागत नाही. त्यामुळं विशेष ट्रेनला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली होती.
ट्रेन फलाटावर लागत असतानाच प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात अनेकजण फलाटावर पडले त्यामुळं चेंगराचेंगरी झाली. मध्य रेल्वेवरील अनेक रेल्वे स्थानकांतून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. त्यामुळं मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे आणि नागपूर या रेल्वे स्थानकांवर आता प्लॅटफॉर्म तिकिटाची विक्री थांबवण्यात आली आहे. 8 नोव्हेंबरपर्यंत तिकिटाची विक्री या स्थानकांत करता येणार नाही, असं मध्य रेल्वेने घेतला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या आजारी प्रवाशांनायातून सूट देण्यात आली आहे.
सणासुदीच्या काळात गर्दी नियंत्रणासाठी सूचना
दिवाळी आणि छट पूजेदरम्यान प्रवाशांची मुव्हमेंट सुरळीतपणे सुनिश्चित करण्यासाठी, प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती प्रतिबंधित करण्यात आली आहे:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
दादर
लोकमान्य टिळक टर्मिनस…— Central Railway (@Central_Railway) October 27, 2024
मध्य रेल्वेबरोबरच पश्चिम रेल्वेनेही प्लॅटफॉर्म तिकिट विक्रीवर निर्बंध आणले आहेत. मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, बोरीवली, वसई रोड, वापी, वलसाड, उधना आणि सूरत या स्थानकात प्लॅटफॉर्म विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत. जेणेकरुन स्थानकात गर्दी होणार नाही.
दरम्यान, सणासुदीनिमित्त उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन मुंबईमधून या उत्तरेकडील राज्यांसाठी अतिरिक्त रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत. अशीच एका स्पेशल ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडाल्याने ही दुर्घटना झाली.