पहाटे-संध्याकाळी गारवा आणि दुपारी ऑक्टोबर हिट अशा वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणजे व्हायरल इन्फेक्शन, सर्दी-ताप-खोकल्याचे रुग्ण वाढले आहे. गणेशोत्सवापासून सुरु झालेलं हे संकट थमण्याच नाव घेत नाही. आता दिवाळीत हा त्रास आणखी वाढला आहे. खोकल्याने तर लोकं हैराण झाले आहेत. अगदी महिनाभर औषध घेऊनही खोकला कमी होण्याच नाव घेत नाही. दिवाळीत तर फटाक्यांच्या प्रदूषणामुळे हा त्रास आणखी वाढेल. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता उपचार घ्यावेत, तसेच खोकला होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.
हा खोकला रात्रीच्या वेळी वाढलेला दिसतो. तसेच, घसादेखील दुखतो. काहीवेळेस मुलांना श्वास घ्यायलादेखील त्रास होताना दिसून येत आहे. त्यामुळे या मुलांना दवाखान्यात दाखल करण्याची वेळ पालकांवर येत आहे. तर मोठी मंडळी या खोकल्याने हैराण होऊन आता दुर्लक्ष करु लागले आहेत. प्रामुख्याने गणेशोत्सवानंतर साथीचे रुग्ण वाढताना दिसून येतातच.
ताप सर्दी, खोकलासोबतर इतर लक्षणेही दिसून येतात. त्यामध्ये ताप, घसादुखी यांचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. एक्स-रे काढला असता, त्यामध्ये न्यूमोनियाचे पॅच दिसत नाहीत. पण खोकला थांबत नाही. "वातावरणातील पॉलन ग्रेन, फंगस, व्हायरल इन्फेक्शन, बांधकामाची धुळ, यामुळे शिंका येणे, खोकला येणे अशी लक्षणे सध्या दिसत आहेत. हे इन्फेक्शन घशात होत आहेत. तसेच HFMD ने पुन्हा एकदा डोकं वर केलं आहे. अशावेळी मुलांची विशेष काळजी घ्या HFMD चा त्रास झाल्यास मुलांना लहान मुलांमध्ये मिसळू देऊ नका. विलिगीकरणात ठेवल्यामुळे हा संसर्गजन्य आजार पसरण्यापासून आपण रोखू शकतो.
* हात वारंवार धुवा, खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाका.
* आजारी असताना मास्क घाला.
* तुमची भांडी, टॉवेल आणि इतर वैयक्तिक वस्तू वेगळ्या ठेवा.
* कुटुंबातील इतर सदस्यांपासून शक्य तितके अंतर ठेवा.
* पौष्टिक अन्न खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
* पुरेशी झोप घेतल्याने तुमचे शरीर रोगाशी लढण्यास सक्षम होते.
काळी मिरी आणि मध
एक चमचा मध 1-2 काळी मिरी मिसळून दिवसातून दोनदा चघळल्याने घशातील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि छातीतील श्लेष्माही साफ होतो. या सोप्या उपायाने तुम्ही घसादुखी आणि कोरड्या खोकल्यापासून लवकर आराम मिळवू शकता.
आल्याचा वापर
आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे घशातील सूज कमी होते. सततच्या कोरड्या खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी, तुम्ही आल्याचा चहा पिऊ शकता किंवा कच्चे आले चघळू शकता.
मध आणि लिंबू
मध आणि लिंबू दोन्ही कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही लिंबाचा रस एक चमचा मधात मिसळून दिवसातून ४-५ वेळा घेऊ शकता, कारण त्याचे कोणतेही नुकसान नाही तर फक्त फायदे आहेत.
हळदीचे दूध
हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे कोरडा खोकला आणि सर्दीमध्ये खूप फायदेशीर असतात. अशा स्थितीत रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात हळद मिसळून प्यायल्यास घसादुखी आणि खोकल्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)