Maharashtra Weather News : मागील काही दिवसांपासून तयारीला लागलेल्या अनेकांचाच उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. कारण, दिवाळीचा सण अखेर सुरू झाला आहे. दिवाळीच्या निमित्तानं खरेदी असो किंवा सजावटीची तयारी असो प्रत्येकजण या साऱ्यामध्ये उत्साहानं सहभागी होत असतानाच या वातावरणावर पावसामुळं विरजण पडताना दिसणार आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तास किंबहुना पुढील चार ते पाच दिवस राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होणार असून, त्यामुळं मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
‘दाना’ चक्रीवादळानंतर आता हवेतील बाष्पाचा पश्चिमेकडे प्रवास सुरू झाला आहे. ज्यामुळं दिवाळीच्या दिवसांदरम्यान राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळानंतर अरबी समुद्राच्या नैऋत्य भागामध्ये वाऱ्यांची चक्राकार स्थिती कायम आहे. ज्यामुळं पावसाचा अंदाज कायम आहे. दरम्यान, विदर्भासह राज्याच्या पश्चिम घाटमाध्यावरील परिसरामध्ये पहाटेच्या वेळी हवेत गारठा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. असं असलं तरीही उष्णतेचा दाह मात्र दुपारच्या वेळेत अडचणी वाढवताना दिसणार आहे ही बाब नाकारता येत नाही.
राज्यात सध्याच्या घडीला सोलापूर येथे 35.4 अंश इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. तर, महाबळेश्वर इथं 15.6 अंश इतक्या निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. सध्या कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, परभणी, नांदेड या भागांमध्ये हलक्या पावसासह गुलाबी थंडीचा अंदाज वर्तवण्यात आला.
राज्यातून मान्सूनच्या वाऱ्यांनी अधिकृतपणे निरोप घेतला असला तरीही ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये राज्यभरात पाऊस कायम होता. त्यातच अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होत असल्यामुळं राज्यात पावसाची हजेरी पाहायला मिळाली. राज्यात एकिकडे पाऊस, दुसरीकडे गुलाबी थंडी असं वातावरण असतानाच येत्या काळात हवामान कोरडं होण्यास सुरुवाच झाल्यामुळं धुलिकणांचं प्रमाण वाढू लागलं आहे. त्यातच आता दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणात वाढ होत असल्यामुळं हवेची गुणवत्ता खालावण्याची शक्यता आहे.