...म्हणून कंपनी लपूनछपून आपल्या कर्मचाऱ्यांचे टॉयलेटमधील फोटो काढून भिंतीवर चिटकवले

Company Photographed Employees In Toilets: टॉयलेटमधील कर्मचाऱ्यांचे फोटो कंपनीनेच भिंतींवर चिटकवले. यामागील धक्कादायक कारण समोर आलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 1, 2025, 09:51 AM IST
...म्हणून कंपनी लपूनछपून आपल्या कर्मचाऱ्यांचे टॉयलेटमधील फोटो काढून भिंतीवर चिटकवले title=
कंपनीवर संतापले लोक (प्रातिनिधिक फोटो)

Company Photographed Employees In Toilets: कर्मचाऱ्यांना अनेकदा इशारा देऊनही त्यांनी त्याकडे फार गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर कंपन्यांकडून कठोर कारवाई केली जाते. यासंदर्भातील अनेक बातम्या तुम्ही यापूर्वी ऐकल्या किंवा वाचल्या असतील. मात्र सध्या एका कंपनीची इंटरनेटवर जोरदार चर्चा आहे. कारण या कंपनीने कर्मचाऱ्यांना धडा शिकवण्याच्या नादात एक भलताच प्रकार केला आहे. यावरुन या कंपनीविरोधात टीकेचे झोड उठल्याचंही पाहयला मिळत आहे. ही कंपनी कोणती आणि त्यांनी केलं काय पाहूयात...

कंपनीने केलं काय?

चीनमधील गुआंगडोंग प्रांतामधील शेनझेन येथील एका कंपनीवर सध्या टीकेची झोड उठण्यामागील कारण म्हणजे या कंपनीने आपल्याच कर्मचाऱ्यांचे टॉयलेटमधील काही फोटो काढल्याचं समोर आलं आहे. 20 जानेवारी रोजी या कंपनीने कर्मचाऱ्यांचे टॉलेटमधील फोटो काढले आणि हे फोटो सार्वजनिक केले. टॉयलेटला जाण्याच्या नावाखाली कर्मचाऱ्या कशाप्रकारे वेळकाढूपणा करतात आणि स्मोगिंक करतात हे दाखवण्यासाठी कंपनीने अशाप्रकारे लपूनछपून फोटो काढल्याचं समोर आल्याने कंपनीवर टीकेची झोड उठली आहे.

कंपनीने असं का केलं?

काही कर्मचारी बराच वेळ गरज नसताना टॉयलेटमध्ये बसून राहतात, असा कंपनीचा दावा आहे. हे कर्मचारी टॉयलेटमध्ये बसून धूम्रपान करणे, मोबाईलवर गेम खेळून टाइमपास करतात, हेच दाखवण्यासाठी आम्ही असे लपून फोटो काढल्याचं सांगत कंपनीने आपल्या कृत्याचं समर्थन केलं आहे. 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, वायफळ वेळ वाया घालवताना टॉयलेटमध्ये जाऊन बसलेले हे कर्मचारी बाहेर उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यांना खरोखरच टॉयलेट वापरायचं असतं तरी त्यांना ते वापरु देत नसल्याचंही म्हटलं आहे.

कंपनीचं नाव काय?

कंपनीकडे वारंवार अशा तक्रारी येत असल्याने कंपनीने अखेर दाराजवळ शिड्या लावून शिड्यांवर चढून अशापद्धतीने टाइमपास करणाऱ्यांचे फोटो काढले. नंतर हेच फोटो वॉशरुममधील भिंतीवर चिटकवण्यात आले. कर्मचाऱ्यांना अद्दल घडवल्यानंतर काही तासांनंतर हे फोटो काढून टाकण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे. हे अशाप्रकारे भिंतीवर लावलेले फोटो चांगले दिसत नसल्याने काढून टाकण्यात आल्याचं कंपनीने स्पष्ट केलं. ज्या कंपनीमध्ये हा सारा प्रकार घडला तिचं नाव Lixun Diansheng असं आहे. 

निर्माण झाले दोन गट

सध्या या कंपनीने उचलेल्या या टोकाच्या पावलावरुन दोन गट निर्माण झाल्याचं दिसत आहे. अनेकांनी हा असला प्रकार म्हणजे कर्मचाऱ्यांच्या खासगीपणावर गदा आणण्याचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे. कायदेशीर मार्गाने हे प्रकरण हाताळता आलं असतं असं अनेकांनी म्हटलं आहे. अनेकांनी कंपनीने केलेला प्रकार हा वेडेपणा असल्याचं म्हटलं असून या कंपनीत कर्मचारी काम करतात की गुलाम असा प्रश्न विचारला आहे. मात्र काहींनी कर्मचाऱ्यांना धडा शिकवायचा आणि वारंवार इशारा देऊनही ते ऐकत नसतील तर अशाप्रकारे जशास तसं धोरणानुसारच वागलं पाहिजे असंही म्हटलं आहे.