Loksabha Election 2024 Baramati : निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागलेय. संपूर्ण राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष ज्या मतदार संघाकडे लक्ष लागलंय त्या बारामतीतमध्ये महाव्होल्टेज रणधुमाळी पाहिला मिळतेय. कारण याठिकाणी नंनद भावजयी समोरासमोर आहेत. (Baramati Loksabha 2024 Indapur campaign Supriya Sule Sunetra Pawar activists in confusion)
आज मतदारसंघाचे महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे, महायुतीच्या सुनेत्रा पवार आणि अपक्ष बंडखोर उमेदवार विजय शिवतारे हे तीनही उमेदवार इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. शेतकरी मेळाव्यानिमित्त महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते इंदापुरात उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेनेचे खासदार नेते संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत.
तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यादेखील सकाळपासूनच शेटफळगढे, मदनवाडी, भिगवण, पळसदेव, बावडा नरसिंहपुर, लाखेवाडी, सराटी, वरकुटे खुर्द हे गाव पिंजून काढणार आहे. या गावातील ग्रामस्थांनी सुनेत्रा पवार संवाद साधणार आहेत.
एकीकडे नणंद भावजया इंदापूरमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना दिसणार आहेत तर दुसरीकडे बंडखोरी करत तिकीट नाही मिळाले तरी अपक्ष लढणार आणि विजय होणार असे म्हणत दंड थोपटलेले शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री विजय शिवतारे हे देखील इंदापूर दौऱ्यावर आहेत. श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर दौऱ्या दरम्यान ते गिरवी, पिंपरी ,बावडा, इंदापूर निमगाव केतकी इथे मतदारांशी हितगुज करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरु असताना मात्र कार्यकर्त्यांची भलतीच गोची झाली आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात फूट पडली आहे. अशातच कार्यकर्त्यांची असं ठरवलं होतं की, शरद पवार यांना ऐकायला तरी जायचं. मात्र आता सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यामुळे शरद पवारांना ऐकायचं की सुनेत्रा पवार यांचा दौरा करायचा अशा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर पडला आहे. दरम्यान एकंदरीत सर्व राजकीय परिस्थिती आणि नेत्यांची गणित पाहता इंदापूरमध्ये राजकीय महाकुंभमेळा दिसून येणार आहे. यावेळी कोण काय बोलणार, कोणाची गाडी कुठे घसरणार, कोणावर टीका होणार हे पाहणं औत्सुकाचं ठरणार आहे.